मिर्झापूर ग्रामवासीयांचा एच.जी. इन्फ्राविरोधात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:17 IST2018-09-29T22:16:53+5:302018-09-29T22:17:10+5:30
तालुक्यातील मिर्झापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत विनापरवानगी सुरू असलेले एच.जी. इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचा सिमेंट मिक्स प्लांट बंद करण्यासाठी गावातील नागरिक सरसावले आहेत. ग्रामपंचायतीने बजावलेल्या नोटीसला कंपनीने केराची टोपली दाखविली आहे.

मिर्झापूर ग्रामवासीयांचा एच.जी. इन्फ्राविरोधात एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यातील मिर्झापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत विनापरवानगी सुरू असलेले एच.जी. इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचा सिमेंट मिक्स प्लांट बंद करण्यासाठी गावातील नागरिक सरसावले आहेत. ग्रामपंचायतीने बजावलेल्या नोटीसला कंपनीने केराची टोपली दाखविली आहे.
अचलपूर ते मोर्शी या ६० किलोमीटर अंतरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम कंत्राट जयपूर येथील एच.जी. इन्फ्रा कंपनीने घेतले आहे. सदर रस्ता तयार करण्यासाठी लागणाऱ्या सिमेंट व काँक्रीट मिक्स करण्याचे प्लांट सदर कंपनीने चांदूर बाजार शहरालगत असलेल्या मिर्झापूर ग्रामपंचायत हद्दीत सुरू केला आहे. या ठिकाणी दोन सिमेंट मिक्स प्लांट सुरू करण्यात आले असून, सदर कंपनीने एकच सिमेंट मिक्स प्लांट सुरु करण्याची परवानगी ग्रामपंचायततर्फे घेतली आहे. मात्र, या एका परवानगीवर आणखी एक सिमेंट मिक्स प्लांट मिर्झापूर ग्रामपंचायतीत सुरू आहे. विनापरवानगी सुरू असलेल्या मिक्स प्लांटविरोधात ग्रामपंचायत प्रशासनाने तीन ते चार वेळा नोटीस बजावली. मात्र, या नोटिशींना केराची टोपली दाखवीत ही कंपनी मनमानी करीत आहे. एच जी इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचे राजकीय तसेच शासकीय अधिकाºयांशी लागेबांधे असल्याने या कंत्राटदार कंपनीची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांतर्फे बोलले जात आहे.
तालुक्यात दिवस-रात्र गौण खनिज उत्खनन करणे, काँक्रिट रस्त्याच्या बांधकामावर नियमानुसार क्युरिंग न करणे, ओव्हरलोड ट्रॅक्टरने सर्रास वाहतूक करणे, नियम बाह्य बांधकाम करणे, नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असलेल्या रासायनिक द्रव्यांचा वापर करून अनधिकृत प्लांट सुरू करणे, पर्यावरण विभागाची नियमानुसार अंमल बजावणी न करणे आदी नियमांना तिलांजली देत सदर कंत्राटदार कंपनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत आहे.
अखेर या कंत्राटदाराविरुद्ध मिर्झापूर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी एल्गार पुकारला असून, विनापरवानगी सुरू असलेला हा सिमेंट मिक्स प्लांट त्वरित बंद करावा, अशी मागणी होत आहे. सिमेंट मिक्स प्लांट विरोधात दंडात्मक कारवाई न झाल्यास मिर्झापूर ग्रामवासी आमरण उपोषणाचा पवित्रा घेणार आहे. यासंदर्भात एच. जी. इन्फ्रा कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
एच जी इन्फ्रा कंपनीने विनापरवानगी आमच्या ग्रामपंचायत हद्दीत मोठा सिमेंट मिक्स प्लांट उभारले आहे. कंत्राटदारांच्या मनमानी कारभार विरुद्ध दंडात्मक कारवाई ना झाल्यास गावकरी रस्त्यावर उतरणार आहे.
- सुभाष घोरमडे,
नागरिक मिरझापुर