गयाठी नाल्याच्या पुरात ‘त्याचा’ मृत्यूशी संघर्ष
By Admin | Updated: August 6, 2015 01:25 IST2015-08-06T01:25:48+5:302015-08-06T01:25:48+5:30
जिल्ह्यात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने सर्व नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.

गयाठी नाल्याच्या पुरात ‘त्याचा’ मृत्यूशी संघर्ष
रात्रभर अनुभवला मृत्यूचा थरार : आॅटोरिक्षासह मोबाईल, २३ हजार रूपयेदेखील गेले वाहून
संदीप मानकर दर्यापूर
जिल्ह्यात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने सर्व नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अमरावतीच्या मंडईत भाजीपाला विकून गावाकडे परतणाऱ्या दोन युवकांचे प्राण कसेबसे पुरातून वाचले. एक जण पुरातून बाहेर निघाला तर त्याचा सहकारी मात्र रात्रभर पुराच्या पाण्यात मृत्यूशी संघर्ष करीत राहिला. ही घटना दर्यापूर तालुक्यातील सांगळूदनजीकच्या गयाठी नाल्यात घडली. त्याने साक्षात मृत्यू अनुभवला.
आकोट तालुक्यातील वडाळीसटवाई येथील रहिवासी बंडू सुखदेवराव पोहरे व अनवर खाँ हे दोघे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता आकोटहून अमरावतीला आले. अमरावतीच्या मंडईत त्यांनी भाजीपाला आणला. त्यानंतर एमआयडीसीत गेले. तेथे त्यांनी जिनिंगसाठी लागणारे सुटे भाग खरेदी केले. सर्व साहित्य घेऊन ते रात्री गावाकडे निघाले. रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास सांगळूूदनजीकच्या गयाठी नाल्याला पूर आला होता. त्यांनी छोटी आॅटोरिक्षा एम.एच.३० एडी- १४४४ हा घेऊन पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. परंतु पुराच्या प्रवाहामुळे आॅटोरिक्षा अडकली. पाणी आॅटारिक्षात शिरताच अन्वरखाँ व बंडू पोहरे यांनी उड्या घेतल्या. परंतु बंडू पोहरे हा पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याने एका झाडाच्या फांदीला घट्ट धरून जीव वाचविला.
याच अवस्थेत त्याला रात्र काढावी लागली. घटनेची माहिती उपविभागीय कार्यालयाला मिळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु रात्री रेस्क्यू आॅपरेशन राबविता आले नाही. सकाळ होताच बंडू पोहरे यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. पोहरे यांचा मोबाईल व २३ हजार रुपयेसुध्दा पुरात वाहून गेले.