हेल्पलाईनने सावरले अनेकांचे जीवन
By Admin | Updated: April 1, 2017 00:31 IST2017-04-01T00:31:37+5:302017-04-01T00:31:37+5:30
समाजातील अन्यायग्रस्त पीडित महिलांच्या समस्या सोडविण्यात हेल्पलाईनने महत्त्वाची भूमिका बजावली.

हेल्पलाईनने सावरले अनेकांचे जीवन
पोलीस आयुक्तांचे प्रतिपादन : विभागीय आढावा बैठक
अमरावती : समाजातील अन्यायग्रस्त पीडित महिलांच्या समस्या सोडविण्यात हेल्पलाईनने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या सहकार्याने हेल्पलाईनने केलेल्या कामगिरीमुळे समाजात उजळ माथ्याने वावरणाऱ्यांना संधी मिळाली. हेल्पलाईनची विश्वसनियतेमुळे अनेकांच्या समस्या मार्गी लागल्या आणि अनेकांची घरे पुन्हा सावरली. असे प्रतिपादन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी हेल्पलाईनच्या विभागीय बैठकीत केले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची हेल्पलाईन २००६ मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यात हेल्पलाईने मोलाचे कार्य केले. ११ वर्षांपासून समाजातील विविध स्तरावरील समस्या सोडण्यात हेल्पलाईन अगे्रसर राहिली. अजूनही ते कार्य सातत्यपूर्ण सुरूच आहे. या हेल्पलाईनचा विस्तार राज्य पातळीवर व्हावा, या उद्देशाने गुरुवारी सायंकाळी डीसीपीईच्या आॅडिटोरियम हॉलमध्ये विभागीय आढावा बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आतापर्यंत हेल्पलाईनने ५ हजार समस्यांचे निवारण केले आहे. या बैठकीला हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासह पाचही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक उपस्थित होते. या बैठकीदरम्यान काही नगरसेवकांचीही सत्कार करण्यात आला आहे. हेल्पलाईनच्या जळगाव, खामगाव, अकोला, नांदुरा, मलकापूर, वाशिम, कारंजा, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, परतवाडा, चांदुरबाजार, चांदूररेल्वे या सर्व शाखेतील कार्यकर्ता सामाजिक समस्या व स्त्रीयांवरील अत्याचाराचा निपटारा करण्यासाठी परिश्रम घेतल्याची माहिती प्रधान सचिव प्रभाकर वैद्य यांनी दिली. बैठकीत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक व हेल्पलाईनचे उपाध्यक्ष श्रीकांत चेंडके, संस्था सचिव माधुरी चेंडके, संजय तिरथकर, समन्वयक मुझफ्फर मास्तर, रवींद्र खांडेकर, विजय पांडे, राजू चांदोळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)