पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 07:50 IST2025-08-28T07:49:46+5:302025-08-28T07:50:17+5:30

Western Vidarbha News: यंदाच्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील तब्बल ६.०८ लाख हेक्टरमधील तूर, कपाशी, सोयाबीन, संत्रा व भाजीपाला पिके बाधित झाल्याचा अहवाल कृषी सहसंचालक कार्यालयाने दिला आहे.

Heavy rains hit six lakh hectares in western Vidarbha, highest damage in August; Agriculture Department report | पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

अमरावती - यंदाच्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील तब्बल ६.०८ लाख हेक्टरमधील तूर, कपाशी, सोयाबीन, संत्रा व भाजीपाला पिके बाधित झाल्याचा अहवाल कृषी सहसंचालक कार्यालयाने दिला आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यातच ४.५८ लाख हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. त्यातच पुढील चार दिवस हवामान विभागाने येलो अलर्ट' जाहीर केल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १,०८,९१३ शेतकऱ्यांच्या ९८,२०९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यासाठी एनडीआरएफच्या निकषाने ८८.२३ कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक ८७,३९० हेक्टरमध्ये नुकसान बुलढाणा जिल्ह्यात झालेले आहे. जुलै महिन्यात २०४ शेतकऱ्यांच्या ५२,९२९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ३१,५४२ हेक्टरमध्ये नुकसानदेखील बुलढाणा जिल्ह्यातील आहे.

पश्चिम विदर्भात यवतमाळ व वाशिम जिल्हा वगळता अमरावती अकोला व बुलढाणा जिल्ह्यात पावसाने अद्याप सरासरी गाठलेली नाही. तरीही ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी १५ टक्के तूट भरून निघाली. 'महावेध'च्या अहवालानुसार, विभागात आतापर्यंत ५८१.५ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना ५७८.५ मिमी पाऊस झालेला आहे.

आठ दिवसांत ४.५८ लाख हेक्टर बाधित
ऑगस्ट महिन्यात १३ ते २० तारखेदरम्यान संततधार पाऊस, अतिवृष्टीने विभागात ४४ तालुक्यांतील ३१५२ गावे बाधित झाली. या गावांमध्ये ४,५७,५८८ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १,१८,३५९ हेक्टर, वाशिम ९८,३५३ हेक्टर, अकोला ९६,९४१ हेक्टर, बुलढाणा ८९,७२८ हेक्टर व अमरावती जिल्ह्यात ५४,२०६ हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. या बाधित गावांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Heavy rains hit six lakh hectares in western Vidarbha, highest damage in August; Agriculture Department report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.