अतिवृष्टीचा फटका, ७.५ लाख हेक्टर बाधित; बळीराजासाठी हवेत ६८७ कोटी
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 31, 2023 16:52 IST2023-08-31T16:50:03+5:302023-08-31T16:52:12+5:30
पश्चिम विदर्भासाठी विभागीय आयुक्तांचा प्रस्ताव

अतिवृष्टीचा फटका, ७.५ लाख हेक्टर बाधित; बळीराजासाठी हवेत ६८७ कोटी
अमरावती : जुलै महिन्यात संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात ८.६६ लाख शेतकऱ्यांच्या ७.५२ लाख हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आल्यानंतर ६८७ कोटींच्या मदत निधीची मागणी विभागीय आयुक्तांद्वारा बुधवारी शासनाकडे करण्यात आली.
मान्सूनला तीन आठवड्यांनी उशिरा आला असला तरी ५ जुलैपासून त्याने दमदार आगमन केले. विभागात जुलैमध्ये संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे ७२२८७४ हेक्टरमधील जिरायती, बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पंचनाम्याद्वारे स्पष्ट झाले. यासाठी ‘एनडीआरएफ’च्या नव्या निकषाने ६८६.८२ कोटींच्या निधीची मागणी व नदी-नाल्यांना पुराने ६१७५६ शेतकऱ्यांची ३० हजार हेक्टरमधील शेती खरडून गेलेली आहे. यासाठी ७८.७५ कोटींची मागणी विभागीय आयुक्त डाॅ. निधी पाण्डेय यांनी शासनाकडे केली आहे.