तो विधवेच्या मुलाला सांगतो, मला पप्पा म्हण; जवळीक साधण्याचा वृथा खटाटोप
By प्रदीप भाकरे | Updated: October 4, 2023 16:45 IST2023-10-04T16:44:11+5:302023-10-04T16:45:13+5:30
विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल

तो विधवेच्या मुलाला सांगतो, मला पप्पा म्हण; जवळीक साधण्याचा वृथा खटाटोप
अमरावती : आपल्या मुलाला अडवून एक माथेफिरू त्याला चल मला पप्पा म्हण, अशी विकृती करत असल्याची तक्रार एका विधवा महिलेने केली आहे. त्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी आरोपी राहुल देवा गवई (३५, रा. बडनेरा) याच्याविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादी महिलेच्या पतीचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले. ती मुलासह राहते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आरोपी तिच्याकडे वाईट नजरेने पाहून शिवीगाळ करतो. तिच्या मुलाला जबरदस्तीने पप्पा म्हणायला लावतो. नाही म्हटल्यास त्या मुलाला मारहाण करतो. दरम्यान ३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास ती मुलाला घेऊन रेस्ट हाऊस मार्गे पायदळ निघाली असता आरोपी राहुल गवई याने तिचा पाठलाग केला. तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. काही वेळाने तिने पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.