‘त्याने’ केला होता बलात्काराचाही प्रयत्न !
By Admin | Updated: March 17, 2016 00:16 IST2016-03-17T00:16:52+5:302016-03-17T00:16:52+5:30
युवा स्वाभिमान संघटना व चैतन्य कॉलनीतील काही युवकांनी नियोजनबध्द पध्दतीने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मुळे अश्लील चाळेखोर दुकानदाराचे बिंग फुटले.

‘त्याने’ केला होता बलात्काराचाही प्रयत्न !
लैंगिक छळ : स्टिंग आॅपरेशनमुळे फुटले बिंग
अमरावती : युवा स्वाभिमान संघटना व चैतन्य कॉलनीतील काही युवकांनी नियोजनबध्द पध्दतीने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मुळे अश्लील चाळेखोर दुकानदाराचे बिंग फुटले. चैतन्य कॉलनीतील ‘ओम कलेक्शन अॅन्ड स्टेशनरी’चा संचालक मोहन गाडगे हा १२ वर्षिय मुलीशी अश्लिल चाळे करताना व्हिडिओ क्लिपमध्ये आढळून आल्याने महिलांसह नागरिकांनी मंगळवारी त्याला बेदम चोप दिला होता. आरोपीने काही दिवसांपूर्वी बालिकेवर बलात्काराचासुध्दा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
आ. राणा यांना प्राप्त झालेल्या निनावी पत्रामध्ये मोहन गाडगे हा दुकानदार दुकानात येणाऱ्या अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करीत असल्याचा उल्लेख होता. गंभीर प्रकाराची दखल घेऊन युवा स्वाभिमानी संघटनेचे विनोद गुहे यांच्या मार्गदर्शनात चैतन्य कॉलनी परिसरातील काही युवकांनी मोहन गाडगेकडे लक्ष केंद्रित केले होते.
चॉकलेट, पैशांचे
दिले आमिष
पीडित बालिकेचे आई-वडील गवंडी काम करून उदरनिर्वाह करतात. गरिबीमुळे पैसे उपलब्ध होतील त्यानुसार छोट्या-छोट्या वस्तुंसाठी तिला या दुकानात जावे लागत होते. याचाच फायदा उचलून मोहन गाडगे याने तिला चॉकलेट व पैशांचे आमिष दिले होते. त्या मोबदल्यात तो तिच्यासोबत अश्लिल चाळे करीत होता. पीडितेच्या बयाणातून ही बाब उघड झाली. त्यातच गाडगे याने काही दिवसांपूर्वी या बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न सुध्दा केल्याचे उघड झाले आहे.
आरोपी लैंगिक चाळे करीत होता तसचे त्याने बलात्काराचा प्रयत्न देखील केला असे पीडित बालिकेने तक्रारीत म्हटले आहे. लैंगिक चाळ्यांचा प्रकार कॅॅॅमेऱ्यात स्पष्टपणे आढळून आल्यास तो महत्त्वाचा पुरावा समजला जाईल. त्या पुराव्यावरूनच आरोपीचा गुन्हा सिध्द होऊ शकतो. तसेच त्याला शिक्षा सुध्दा होऊ शकते.
- रियाजुद्दीन देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त.