प्रसूतीच्या २७ दिवसांनंतर मिळाली सुखाची अनुभूती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 05:00 AM2021-11-06T05:00:00+5:302021-11-06T05:00:56+5:30

डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्या बाळाचा १४०० ग्रॅमहून १७०० ग्रॅम वजनापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, आलेली आव्हाने अन् २५ दिवसांनंतर त्या नवजाताला मिळालेली आईच्या कुशीची उब, त्यासाठीच उत्सव ठरतो. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी त्या उत्सवात सहभागी होतात. त्या नवजाताची प्रगती जाणून घेतात. अन् त्या लहानग्याला सुदृढतेकडे नेणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक देखील करतात. हे सारे घडलंय ते अनाथांचा नाथ असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्या वर्षा या मूकबधिर मानसपुत्री व जावई तथा मानसपुत्र समीर यांच्या जीवनवेलीवर.

Happiness felt after 27 days of delivery! | प्रसूतीच्या २७ दिवसांनंतर मिळाली सुखाची अनुभूती!

प्रसूतीच्या २७ दिवसांनंतर मिळाली सुखाची अनुभूती!

Next

प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बाळ जन्मल्यावर एका तासाच्या आत त्याला आईजवळ देऊन स्तनपानाची यशस्वी सुरुवात करावी, असे मानले जाते. पान्हा फुटलेल्या स्तनाला बाळ लुचते आणि दूध यायला सुरुवात होते. स्तनपान हाच बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. प्रसूतासाठी दोन गोष्टी स्वर्गसुखाहून कमी नसतात.  एक म्हणजे बाळ पोटात असताना त्याच्या हालचाली आणि दुसरे म्हणजे स्तनपान. स्तनपान करणे ही स्वर्ग सुखाची अनुभूती आहे. मात्र, अनेक प्रसूतांच्या वाट्याला तसे सर्वोच्च सुखाचे क्षण येत नसतात. त्यामुळेच येथील एका मूकबधिर विवाहितेला प्रसूतीच्या २७ दिवसांनंतर मिळालेली स्तनपानाची, सुखाची अनुभूती ‘वेगळी’ ठरते. 
डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्या बाळाचा १४०० ग्रॅमहून १७०० ग्रॅम वजनापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, आलेली आव्हाने अन् २५ दिवसांनंतर त्या नवजाताला मिळालेली आईच्या कुशीची उब, त्यासाठीच उत्सव ठरतो. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी त्या उत्सवात सहभागी होतात. त्या नवजाताची प्रगती जाणून घेतात. अन् त्या लहानग्याला सुदृढतेकडे नेणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक देखील करतात. हे सारे घडलंय ते अनाथांचा नाथ असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्या वर्षा या मूकबधिर मानसपुत्री व जावई तथा मानसपुत्र समीर यांच्या जीवनवेलीवर. १० ऑक्टोबर रोजी समीर व वर्षा या मूकबधिर दाम्पत्याच्या जीवनवेलीवर फुल उमलले. मात्र, ते फुल अवघ्या १४०० ग्रॅमचे होते. वेळेपुर्वीच प्रसूती झाल्याने त्या बाळाला जन्मत:च अनेक व्याधींनी ग्रासले. अनेक अवयवांची संपूर्ण वाढ न झाल्याने रक्तपुरवठयाचा प्रश्न देखील निर्माण झाला. त्या नवजाताला तातडीने त्याच दिवशी राधानगरस्थित एका रूग्णालयातील ‘एनआयसीयू’मध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांनी वैद्यकीय प्रयत्नांची शर्थ केली. वजन अतिशय कमी असल्याने त्याला त्याची आई स्तनपान करू शकत नव्हती. त्यामुळे नवजाताच्या आईला वझ्झर येथे पाठविले होते. 

शंकरबाबांना निरोप अन् धडपड 
बाळाचे वजन १ किलो ७०० ग्रॅमवर पोहोचल्याने त्याला त्याच्या आईला स्तनपान करता येईल, असा निरोप शंकरबाबांना देण्यात आला. मग काय, ८० वर्षांच्या या तरूणाने मानसकन्येसोबत लगोलग सकाळीच अमरावती गाठली. याबाबत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनादेखील कळविण्यात आले, शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी शंकरबाबांसह ते हॉस्पिटल गाठले. काहीवेळातच त्या मातेने पहिल्यांदा आपल्या नवजाताला स्तनपान केले. 

स्तनपानामुळे बाळाचे पोषण तर होतेच पण त्याचबरोबर त्याची रोगप्रतिबंधक शक्तीही वाढते. जास्त वेळा अंगावर पाजल्याने आईच्या दुधाचे प्रमाण वाढते. अंगावर पिताना आईच्या कुशीची बाळाला उबही मिळते. या भावनेतून डॉक्टरांनी केलेल्या महत्कार्याला माझा सलाम.
शंकरबाबा पापळकर, जेष्ट समाजसेवक, वझ्झर

 

Web Title: Happiness felt after 27 days of delivery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.