पाण्याला सुटली दुर्गंधी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, मुख्य प्रवेशद्वारालाच तलावपरतवाडा : अचलपूर नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील आठवडी बाजारात वर्षभरही घाणीचे साम्राज्य राहते. गत तीन दिवसांपासून पावसामुळे बाजारात नेणार्या मुख्य प्रवेशद्वारावरच छोटेखानी तलाव निर्माण झाला आहे. या साचलेल्या घाण पाण्याची दुर्गंधी सुटली असून, यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सीमेंट कॉंक्रीट रस्ता नव्याने तयार करताना पालिकेच्या अभियंत्यांच्या करामतीमुळे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
लॉक डाऊनमुळे सर्वत्र शांतता असली तरी आठवडी बाजारात ठोक पालेभाजी व्यवसायिक आणि चिल्लर भाजीपाला विक्रेते येतात. शहरातील हा प्रमुख मार्ग आहे. यामुळेच महत्त्वाच्या कामासाठी या मार्गावरूनच नागरिकांना ये-जा करावी लागते. अशात तीन-चार दिवसांपासून पावसाने दररोज हजेरी लावली आहे. त्यात नेहमीप्रमाणे येथे तलाव साचला. त्या पाण्याची दुर्गंधी पसरली आहे
बॉक्स
करायला गेले काय आणि..
पूर्वीचा डांबरीकरणाचा रस्ता हरविल्यामुळे उशिरा का होईना, अचलपूर नगरपालिकेच्यावतीने आठवडी बाजार अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम महिन्यांपूर्वी करण्यात आले. मात्र, रस्ता निर्मिती करताना पालिकेच्या अभियंत्यांना उताराचे पाणी जाणार कुठे, याचे भानच राहिले नाही. कंत्राटदाराकडून लाखो रुपये खर्च करून तयार केलेला नवीन सिमेंट रस्ता फोडून पाण्याची विल्हेवाट लावली जाणार की पालिकेचे अभियंता नवीन मार्ग शोधतील, हा औत्सुकतेचा विषय ठरला आहे.
बॉक्स
लाखो रुपयांचे स्वच्छता कंत्राट
गेल्या अनेक वर्षांपासून अचलपूर नगरपालिकेच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्नांचा भडीमार सतत होतो. त्याचा काहीएक परिणाम पालिकेवर कधी झालेला दिसून आला नाही. नागरिकांच्या आरोग्याची त्यांची जबाबदारी आहे का, या प्रश्नाचे उत्तर या शहरातील ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाच्या रूपाने मिळते. पालिका मात्र खासगी कंत्राटदारांना लाखो रुपयांचे स्वच्छता कंत्राट न चुकता देते, एवढे मात्र निश्चित