पालकमंत्र्यांनी ठेवले तिष्ठत नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:09 IST2019-09-17T00:09:30+5:302019-09-17T00:09:46+5:30
शासकीय कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, तीन तासानंतरही ते आले नाहीत. अखेर आ. यशोमती ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उपरोधिक भूमिपूजन पार पाडले. विरोधी पक्षातील आमदाराच्या मतदारसंघातील भूमिपूजनाला पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली, असा आरोप आमदार यशोमती ठाकूर आणि समर्थकांनी केला.

पालकमंत्र्यांनी ठेवले तिष्ठत नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखड्यांतर्गत मंजूर झालेल्या १ कोटी ४० लक्ष रुपये खर्चाच्या वलगाव येथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणी कामाचे सोमवारी दुपारी गावातीलच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या शासकीय कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, तीन तासानंतरही ते आले नाहीत. अखेर आ. यशोमती ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उपरोधिक भूमिपूजन पार पाडले. विरोधी पक्षातील आमदाराच्या मतदारसंघातील भूमिपूजनाला पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली, असा आरोप आमदार यशोमती ठाकूर आणि समर्थकांनी केला.
वलगाव येथील पेढी नदीवर असलेल्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या निर्वाणभूमीच्या विकासासाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांतून तत्कालीन काँग्रेस सरकारने ४० कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा मंजूर केला होता. या आराखड्यात नवीन बस स्थानकाचा समावेश करण्यात आला. सोमवारी सकाळी १० वाजता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन ठरविण्यात आले. आ. ठाकूर वेळेत पोहोचल्या; मात्र पालकमंत्री दुपारी १ पर्यंत उपस्थित झाले नाहीत. ते दुपारी २ पर्यंत भूमिपूजनाला येतील, असा निरोप जिल्हाधिकाऱ्यांकरवी पोहचविण्यात आला. मात्र, प्रतीक्षा करून आधीच ग्रामस्थ कंटाळले होते, त्यात पावसाचे वातावरण असल्याने गावातीलच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. आपण काँग्रेसच्या आमदार असल्याने सत्ताधीशांनी आपली अडवणूक चालविली असून, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा दम आ. यशोमती ठाकूर यांनी भूमिपूजनानंतर भरला. भूमिपूजन फलकावर उपस्थित म्हणून परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खा. नवनीत राणा, आ. सुनील देशमुख, आ. श्रीकांत देशपांडे, आ. प्रवीण पोटे, आ. अरुण अडसड, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांची नावे आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलेल्या या भूमिपूजनामुळे राजकीय वातावरण तापले आहे.