Guardian Minister Praveen Pote's Wonders at Home | पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरावर जादूटोणा
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरावर जादूटोणा

ठळक मुद्देपोलिसांत तक्रार : जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत पाच महिलांसह एका युवकावर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बांधकाम, खनिकर्म, पर्यावरण आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरासमोर जादूटोणा करण्यात आल्याची तक्रार त्यांचे स्वीय सहायक अमोल मुकुंद काळे (३९, रा. कठोरा नाका) यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. या प्रकरणात पोलिसांनी पाच महिलांसह राहुल काळे नामक तरुणाविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास तक्रारकर्ता हे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या राठीनगरातील राहत्या घरी उपस्थित होते. दरम्यान, बंगल्यासमोर कोणीतरी गोंधळ घालत असल्याचे त्यांचे स्वीय सहायक अमोल काळे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बंगल्याबाहेर जाऊन बघितले असता, बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाच महिला व एक पुरुष काही तरी जाळताना आणि जादूटोण्यासाठीचे साहित्य ठेवत असतानाचे दिसले. पाच महिला व एका तरुणाने बंगल्यासमोर हिरवी साडी, बांगड्या, हळद-कुंकू, भुलजी , लिंबू, मिरची बंगल्यासमोर फेकल्या. मंत्रोच्चार करावा तसे काही पुटपुटले व तेथून पळ काढला. त्यामुळे मनात भीती निर्माण झाल्याचे काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
गाडगेनगर पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी पाच महिला व राहुल काळेंविरुद्ध कलम २ (१), (ख), ८, ३, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ नुसार गुन्हा नोंदविला आहे. यासंबंधाने प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना वारंवार संपर्क केला. तथापि, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
राणा म्हणाले, म्हणूनच तर म्हणतो बालकमंत्री !
युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यानी पालकमंत्र्यांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावले. पालकमंत्र्यांमध्ये गट्स नाहीत. ते केवळ भाषण देतात; काम शून्य आहे. म्हणूनच त्यांना बांगड्या दिल्या. आमदार रवि राणा यांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावण्याचे आव्हान पालकमंत्री आणि कार्यकर्त्यांनी दिले होते. मी ते आव्हान स्वीकारले. वाटही बघितली. ते आलेच नाहीत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना साडी-चोळी आणि बांगड्या भेट दिली. सोबत बेशरमचे झाडही दिले. जादूटोण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही जे करतो, ते तात्काळ करतो. त्यावेळच्या छायाचित्रात बॅनर दिसत आहे. त्यावरून आंदोलन स्पष्ट होते. पालकमंत्र्यांना अशी तक्रार द्यावी लागली, हे दुर्भाग्य आहे. पोलिसांचा सहारा घेऊन खोटी तक्रार देणे आणि खोटे आरोप करणे, हे पालकमंत्र्यासाठी अशोभनीय आहे. म्हणूनच मी त्यांना बालकमंत्री म्हणतो.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नेमके काय घडले, हे तपासून पाहण्यासाठी तपास सुरू आहे.
- यशवंत सोळंके,
पोलीस उपायुक्त.

Web Title: Guardian Minister Praveen Pote's Wonders at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.