पोहरा-चिरोडी जंगलाने पांघरली हिरवी चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:31+5:30
गतवर्षी कमी पर्जन्यमान व उन्हाळ्यात कडाक्याच्या उन्हामुळे पोहरा-चिरोडी जंगल भकास झाले होते. त्यातच उन्हाळ्यात या जंगलात आगीच्या घटना घडल्या. नदी-नाले आटल्याने वन्यप्राण्यांनी शिवारापर्यंत धडक दिली होती. रानवाटाही धुळीने माखल्या होत्या. परंतु, पावसाळ्याच्या प्रारंभीच बरसलेल्या मेघांनी किमया केली आणि जंगल हिरवेगार झाले.

पोहरा-चिरोडी जंगलाने पांघरली हिरवी चादर
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : महानगराची फुफ्फुसं अशी ओळख असलेल्या पोहरा-चिरोडी जंगल एक-दोन पावसातच हिवरळीने नटले आहे. उन्हाळ्यात बोडख्या झालेल्या रानवाटांच्या कडेला झाडांची गच्च हिरवी पालवी डोलत आहे. टेकड्यांच्या दऱ्या-खोऱ्यातून वाहणारे ओहोळ, नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये बंदिस्त अमरावतीकरांना येथील निसर्ग पावसाळी पर्यटनासाठी खुणावत आहे.
गतवर्षी कमी पर्जन्यमान व उन्हाळ्यात कडाक्याच्या उन्हामुळे पोहरा-चिरोडी जंगल भकास झाले होते. त्यातच उन्हाळ्यात या जंगलात आगीच्या घटना घडल्या. नदी-नाले आटल्याने वन्यप्राण्यांनी शिवारापर्यंत धडक दिली होती. रानवाटाही धुळीने माखल्या होत्या. परंतु, पावसाळ्याच्या प्रारंभीच बरसलेल्या मेघांनी किमया केली आणि जंगल हिरवेगार झाले.
रानवाटा सुंदर भासत आहेत. नवी पालवी, विविध फुले यामुळे फुलपाखरे, कीटकांची रुंजी तसेच पक्ष्यांचा किलबिलाट झाला आहे. बिबट, हरिण, सांबर, मोर, रोही, रानडुक्कर, नीलगाय, ससे, काळवीट, लांडोर, कोल्हे, सोनकुत्रे, सायळ, रानमांजर आदी वन्यप्राण्यांचा मुक्तविहार या जंगलात आहे. हिरवळीने नटलेले पोहरा-चिरोडी जंगल पर्यटकांना खुणावत आहे. अमरावती शहरापासून या जंगलाची सीमा विस्तारल्याने शहरवासीयांना याबाबत विशेष आकर्षण आहे.