आरोग्याच्या उपाययोजना ग्रामसभेतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:22 IST2017-12-17T23:22:03+5:302017-12-17T23:22:45+5:30
मेळघाटातील अतिदुर्गम भागातील आरोग्यविषयक समस्या ग्रामसभेच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात, त्या सोडविण्याच्या दृष्टीने समन्वय साधावा,....

आरोग्याच्या उपाययोजना ग्रामसभेतून
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : मेळघाटातील अतिदुर्गम भागातील आरोग्यविषयक समस्या ग्रामसभेच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात, त्या सोडविण्याच्या दृष्टीने समन्वय साधावा, यामध्ये कुपोषित बालक, मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दिले.
आरोग्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी दिल्यात. यावेळी त्यांनी दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा आणि आरोग्यविषयक सेवा जाणून घेण्यासाठी या भागाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य सेवा संचालक सतीश पवार, अतिरिक्त संचालक अर्चना पाटील, उपसंचालक अंबाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी आसोले आदी उपस्थित होते.
डोमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील भेटीदरम्यान त्यांनी या ठिकाणी होत असलेल्या प्रसुतींची संख्या, बालमृत्यू, कुपोषणाची माहिती जाणून घेतली. या भागात माता-बालमृत्यू होऊ नये, यासाठी प्रभावी उपायायोजना करण्यात याव्यात. माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी आशा सेविकांना प्रशिक्षण देण्यात यावे. कमी कालावधीत होणारी प्रसूती सुरक्षितरीत्या होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत आशा सेविकांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश ना. दीपक सावंत यांनी दिले.
दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी गावातील नागरिक आणि आरोग्य यंत्रणांतील कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधावा. यासाठी गावातील अंगणवाडी सेविका, नर्स, आशा सेविका, सरपंच आणि ग्रामस्थांनी एकमेकांशी समन्वय साधावा, असे निर्देशही ना. सावंत यांनी दिले.