ग्रामपंचायतींचे रिंगण फिक्स, आता नऊ दिवस प्रचाराची रिक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:59+5:302021-01-08T04:38:59+5:30
अमरावती : गावाचा प्रमुख ठरविण्यासाठी मैदानात अखेरच्या क्षणापर्यत कोण कोण राहणार याची उत्सुकता अखेर संपली आहे. त्यामुळे मैदानातील चेहरे ...

ग्रामपंचायतींचे रिंगण फिक्स, आता नऊ दिवस प्रचाराची रिक्स
अमरावती : गावाचा प्रमुख ठरविण्यासाठी मैदानात अखेरच्या क्षणापर्यत कोण कोण राहणार याची उत्सुकता अखेर संपली आहे. त्यामुळे मैदानातील चेहरे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे आता पुढचे ९ दिवस केवळ प्रचाराचा धुराळा उडणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार हा गावच्या विकासाच्या मुद्यावर असेल, गटातटाचा असेल, जुन्या नव्याचा असेल, आणि भष्ट्राचार, गैरकारभार विकासाच्या मुद्यावरही उठेल. १५ जानेवारी रोजीपर्यंत निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीत परिस्थिती एकदम कडक राहणार आहे. निवडणूक होत असलेल्या गावांमध्ये निवडणूक यंत्रणेचे बारकाईने लक्ष आहे. यात निवडणूक नियमाबाबतच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन व्हावे, याबाबत निर्देश संबंधित ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे. या अटी व शर्तींचे पालन करताना प्रत्येकाला घाम फुटणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत प्रत्येक बाबींवर केलेल्या एकूण एक पैशाचा हिशेब प्रशासनाकडे निश्चित मुदतीत सादर करावा लागणार आहे. अन्यथा पुढील सहा वर्षे निवडणुकीतून बाद व्हावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासोबतच आपल्या खर्चाचाही हिशेब देणे बंधनकारक आहे. एकंदरित जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ५४१ ग्रामपंचायतीत आगामी १३ जानेवारीपर्यंत प्रचाराचा धुराळा उडणार आहे.