Ganesh Chaturthi 2018; गणरायाच्या स्वागतासाठी अंबानगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:29 AM2018-09-13T11:29:44+5:302018-09-13T11:30:08+5:30

‘गणपती बाप्पा मोरया..’चा एकच घोष ऐकू येण्यास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. जिल्हाभरात सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी गणरायाच्या आगमनाच्या तयारीला वेग आला आहे.

Ganesh Chaturthi 2018; Ambanagari ready for the welcome of Ganaraya | Ganesh Chaturthi 2018; गणरायाच्या स्वागतासाठी अंबानगरी सज्ज

Ganesh Chaturthi 2018; गणरायाच्या स्वागतासाठी अंबानगरी सज्ज

googlenewsNext
ठळक मुद्देबाजारपेठ फुलली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘गणपती बाप्पा मोरया..’चा एकच घोष ऐकू येण्यास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. जिल्हाभरात सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी गणरायाच्या आगमनाच्या तयारीला वेग आला आहे. यानिमित्त बाजारपेठ गणेशोत्सवासाठी सजावटीच्या विविध साहित्यांनी सजली आहे.
शहरातील गोपालनगर, फ्रेजरपुरा, राजापेठ, अंबागेट, नेहरू मैदान, शेगाव नाका, बडनेरा आदी ठिकाणाहून भव्य गणेशमूर्ती मंडळांकडून नेल्या जाणार आहेत. त्यासाठी वाहन, ढोल-ताशे, पारंपरिक भजनी पथक, गायक-वादक मंडळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव अंतिम टप्प्यात आहे. हा सण कॅश करण्यासाठी सजावटीच्या साहित्यासह गुलाल, पूजा साहित्य मोठ्या प्रमाणात अमरावतीत दाखल झाले आहे. हैद्राबाद निर्मित गुलाल आणल्याची माहिती आहे.
गणराया म्हणजे चैतन्याचे मूर्तिमंत प्रतीक. त्याचेच आगमन होणार असल्याने सर्वत्र उत्साह, चैतन्याचा संचार दृष्टीस पडत आहे. आझाद मंडळ, निळकंठ मंडळ, बजरंग मंडळ, न्यू आझाद मंडळ, विद्यार्थी गणेश मंडळ, श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळासह इतर गणेश मंडळांच्या गणरायाच्या आगमनानिमित्त निघणाऱ्या रॅलीचेही आकर्षण शहरवासीयांना लागले आहे. काही मंडळांचे देखावे बिगबजेट आहेत. राज्यासह देशातील मंदिरे, किल्ले, राजदरबार, हवेली आदी प्रमुख स्थळांचे मनोहारी दर्शन यावेळी होईल.
जिल्ह्यात तीन हजारांवर सार्वजनिक मंडळे आहेत. ग्रामीणमध्ये २४४०, तर शहरात ५४९ गणेशमूर्तींची स्थापना केली जाणार आहे. घरोघरीही गणरायाची स्थापना होईल. चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

रोषणाई : सीरीज, एलईडी
गणेशोत्सवानिमित्त सजावटीसोबतच रोषणाईसाठी बाजारपेठेत यंदा पारंपरिक सीरीज व एलईडी विक्रीस आहेत. यात सीरीज, लॅम्प, कंदील, झुंबराकरिता आकर्षक रंगसंगतीचा वापर केला आहे. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार हे साहित्य खरेदी करीत असल्याचे विक्रेते महेश आहुजा यांनी सांगितले.

मोत्याच्या माळा, झेंडू हार
लाडक्या गणरायाच्या सजावटीसाठी मोत्याच्या माळा, मोती हार, हार्डबोर्ड, गुलाब हार, झेंडू हार, गणपती छत्री, कपडे, तोरणे, पडदे, झालर, टोपी, आदी सजावटीचे साहित्य मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली येथून शहरात दाखल झाले. ९० रुपये डझन व नगाने ५०० पर्यंत किंमत असल्याचे विक्रेते रोशनभाई यांनी सांगितले.

ड्रायफ्रूट मोदक
लाडक्या बाप्पांना अर्पण करण्यासाठी ड्रायफ्रूट्स मोदकासह वेगवेगळ्या प्रकारचे मोदक विक्रीस उपलब्ध झाले आहेत. मिठाईची दुकानेही सजली आहेत. मिठाई तयार करण्यासाठी गुजरातेतून खवा आणला जात आहे. यंदा ड्रायफ्रूट मोदक, मलाई मोदक, केसर मोदक, खोबरा मोदक आदी प्रकार पाहावयास मिळतील. त्यांचे दर २८० रूपयांपासून तर ४०० रुपये किलोपर्यंत आहेत. ग्राहकांची पहिली पसंती या मिठाईला असल्याचे विक्रेते प्रदीप धोराजीवाला यांनी सांगितले.

देखणे मखर यंदाचे खास आकर्षण
यावर्षी गणेशोत्सव सजावटीचा खास आकर्षण म्हणजे मखर आहे. इको-फ्रेंडली मखराने सजावटीचे काम सोपे केले आहे. यामध्ये रंगरंगोटी, लाइटिंग वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे विक्रेते अशोक पिंजाणी म्हणाले.

 

Web Title: Ganesh Chaturthi 2018; Ambanagari ready for the welcome of Ganaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.