दर्यापुरात नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी
By Admin | Updated: May 8, 2014 00:45 IST2014-05-08T00:45:07+5:302014-05-08T00:45:07+5:30
ज्योत्स्ना चव्हाण यांचा अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ २८ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यात नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार..

दर्यापुरात नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी
२८ जून रोजी संपणार कार्यकाळ : कोण मारणार बाजी? काँग्रेस की नगरसुधार!
दर्यापूर : ज्योत्स्ना चव्हाण यांचा अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ २८ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यात नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून आतापासूनच नगराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सर्वसाधारण महिलांसाठी हे पद आरक्षित आहे.
दर्यापूरच्या नगराध्यक्षपदी ज्योत्स्ना चव्हाण विराजमान आहेत. दर्यापूर नगरपरिषदेत काँग्रेसचे सात, नगरसुधार समिती आठ, भाजपा २, बहुजन विकास आघाडी ३ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, बहुजन विकास आघाडीच्या वंदना राजगुरे व मीना प्रांजळे यांनी वर्षभरापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने काँग्रेसचे संख्याबळ नऊ झाले आहे. अडीच वर्षांपूर्वी ज्योत्स्ना चव्हाण यांनी काँग्रेसचे सात व नगरसुधार समितीची आठ मते घेऊन नगराध्यक्षपद मिळविले होते. त्यावेळी अडीच-अडीच वर्षांचा समझोता झाला होता. मात्र, सध्या नगरपरिषदेत काँग्रेस व नगरसुधार आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व नगरसुधार आघाडीत झालेला करार कायम राहणार की त्यात बदल होणार हे आताच सांगणे कठीण आहे. दर्यापूर नगरपरिषदेत एकूण दहा महिला नगरसेवक आहेत. काँग्रेसमध्ये पाच, नगरसुधारकडे चार, भाजपात एक महिला नगरसेवक आहे. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व नगरसुधारमध्ये झालेल्या कराराची अंमलबजावणी न झाल्यास काँग्रेसला हे पद आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी आणखी दोन सदस्यांची मदत लागणार आहे. तर नगरसुधारला तीन सदस्यांची गरज भासणार आहे.