अमरावतीतील 'मनरेगा'ची चार हजार कामे बंद, ८० हजार मजुरांवर 'उपासमारी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:26 IST2026-02-05T17:25:26+5:302026-02-05T17:26:39+5:30
Amravati : मेळघाटातील होळीचा बेरंग, कर्मचारी संपामुळे 'नरेगा'ची कामे प्रभावित

Four thousand MNREGA works in Amravati closed, 80 thousand laborers on hunger strike
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : 'मनरेगा' योजनेचे कर्मचारी २७ जानेवारीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे पाच दिवसांत जिल्ह्यातील ४०९७ कामे बंद पडली, याचा किमान ८० हजार मजुरांना फटका बसला. मेळघाटातील ३० हजारांवर मजुरांच्या होळीचा बेरंग होत आहे, तर सामाजिक वनीकरणातील रोपवाटिका, रोपलागवड आदी कामे ठप्प पडली आहेत. या संपामुळे रोजगार हमी योजनेची सर्व कामे सध्या बंद आहेत. फेब्रुवारी महिना सुरू झाल्याने शेतातील कामे कमी झाली आहेत. अशा वेळी मजूर मोठ्या आशेने रोहयोच्या कामांकडे वळतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मस्टर काढण्यापासून ते मोजणीपर्यतची सर्व कामे थांबली आहेत. शिवाय मजुरांची मस्टर प्रदाने सुद्धा प्रलंबित आहेत.
चिखलदरा व धारणी तालुक्यांतील आदिवासी मजुरांना तातडीने मनरेगा योजनेचे काम उपलब्ध न झाल्यास स्थलांतर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी स्थिती आहे. संपामुळे वैयक्तिक लाभार्थी यांची कामे अर्धवट स्थितीत असून त्यांच्यामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
४०९७ कामांवरील ७९,५१४ मजूर कमी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कंत्राटी कर्मचारी यांचा २३ जानेवारीपासून संप सुरू असून जिल्ह्यात दैनिक मजूर उपस्थिती ९६२२२ व कामे ५९९८ सुरू होती व सद्यः स्थितीत १६५१८ मजूर कामांवर व फक्त १९०१ कामे सुरू आहेत. त्यामुळे ४०९७ कामे प्रभावित झाल्याने ७९,५१४ मजूर कमी झाले. त्यामुळे 'मनरेगा' योजनेची स्थिती गंभीर झाली आहे.
मेळघाटातील मजुरांवर उपासमारीची वेळ
मेळघाट आदिवासी मजुरांना मनरेगा योजनेच्या कामाव्यतिरिक्त उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही. संपामुळे मनरेगा कामे ठप्प झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आदिवासी बांधवांचा होळी हा महत्त्वाचा सण एक महिन्यावर आलेला आहे. मात्र संपामुळे निघालेले मस्टर ऑनलाइन करून त्यांची प्रदाने करणे अद्याप प्रलंबित असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ उद्भवली आहे.
रोपवाटिका सुकल्या, वृक्षलागवड प्रभावित
जिल्ह्यात मनरेगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वाधिक फटका सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिका व वृक्षलागवड कामांना बसला आहे. या ठिकाणी वृक्षलागवड कामांवर दररोज मजूर असणे आवश्यक आहे. मात्र संपामुळे मजुरांचे मस्टर निघत नाही. त्यामुळे मजुरांनी कामावर येणे बंद केले आहे. अशा परिस्थितीत रोपांचे व वृक्ष लागवडीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.