लोकमत न्यूज नेटवर्कवरूड (अमरावती): आख्यायिकेतून जन्माला आली श्रद्धा आणि ती परंपरा बनून गोटमार यात्रेच्या स्वरूपात वर्षानुवर्षे हजारोंच्या रक्ताचे पाट वाहवत राहिली. दोन्ही राज्यांतील नागरिकांची लाखोंच्या संख्येने हजेरी असलेल्या या यात्रेत यंदा जांब नदीतील झेंडा मिळविण्याच्या चढाओढीत ९३४ भाविक जखमी झाले. दोन गंभीर जखमींना नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पोळ्याच्या पाडव्याला ही यात्रा नजीकच्या मध्य प्रदेशातील पांढुर्णा व सावरगाव या दोन गावांमध्ये पार पडली. पोळ्याच्या पाडव्याला अर्थात श्रावणी अमावास्येला सकाळी सहा वाजता पळसाच्या झाडाचा झेंडा विधिवत पूजाअर्चा करून जांब नदीच्या मध्यभागी लावण्यात येऊन गोटमार यात्रेला सुरुवात झाली.
पांढुर्णा आणि सावरगाव या गावांदरम्यान जांब नदी असून नदीमध्ये असलेल्या चंडीमातेची पूजा करून सावरगाव येथील भाविक पळसाचे झाड तोडून आणून लावतात. ही पूजाअर्चा करण्याचा मान कावळे परिवाराला आहे. पळसाच्या झाडाचा झेंडा लावल्यानंतर पांढुर्णा आणि सावरगावच्या भाविकांमध्ये गोटमारीची धुमश्चक्री सुरू होते. झेंडा न मिळाल्यास सूर्यास्तानंतर तो काढून चंडीमातेच्या मंदिरात नेऊन पूजापाठ, आरती करून गोटमार यात्रेची सांगता होते.
चोख बंदोबस्तसुरक्षेकरिता छिंदवाडा, बैतूल, सिवनी, नरसिंगपूर आणि पांढुर्णा येथील सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अजय देव, जिल्हा पोलिस अधीक्षक सुंदरसिंग कणिक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सहा अस्थायी आरोग्य केंद्रेमध्य प्रदेश प्रशासनाने सहा अस्थायी आरोग्य केंद्रे, ५८ डॉक्टर, २०० आरोग्य सेवक आणि सुरक्षेसाठी ६०० पोलिस कर्मचारी तैनात केले होते. पांढुर्णा जिल्हाधिकारी अजय देव यांनी कलम १४४ लागू करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला.
१९५२ पासून १३ लोकांचा मृत्यूगोटमार यात्रेची परंपरा ४०० वर्षांपूर्वीची असल्याचे जाणकार सांगतात. यात १९५५ मध्ये पहिला बळी गेला होता. तेव्हापासून २०२३ पर्यंत १३ लोकांचे बळी गेले, तर हजारो भाविकांना अपंगत्व आले. ज्यांच्या घरातील लोक अपंग किंवा बळी गेला ते या दिवसाला शोक व्यक्त करतात. मात्र, बळींची नोंद मध्य प्रदेश शासनाकडे नाही, हे विशेष.