वने विभागाच्या सुवर्ण पदक विजेत्या आरएफओला ४० दिवसांतच निलंबन

By गणेश वासनिक | Updated: June 6, 2025 13:12 IST2025-06-06T13:11:03+5:302025-06-06T13:12:11+5:30

Amravati : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना गौरविल्यानंतर शासनाला झाली उपरती

Forest Department's gold medal-winning RFO suspended after 40 days | वने विभागाच्या सुवर्ण पदक विजेत्या आरएफओला ४० दिवसांतच निलंबन

Forest Department's gold medal-winning RFO suspended after 40 days

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
वने आणि वन्यजीव संवर्धनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दि. २१ मार्च २०२५ रोजी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सुवर्ण पदकाने गौरवण्यात आलेल्या महिला आरएफओला अवघ्या ४० दिवसांत निलंबित करण्यात आले आहे. स्नेहल अवसरमल वनक्षेत्रपाल (प्रादेशिक) नवापूर, धुळे असे निलंबित करण्यात आलेल्या आरएफओचे नाव आहे.


धुळे जिल्ह्यातील नवापूर येथील प्रादेशिक वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असलेल्या स्नेहल अवसरमल यांच्यावर शासकीय कर्तव्यात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि वित्तीय अनियमितता केल्याचे आरोप आहेत. यासंदर्भात धुळेचे प्रादेशिक वनसंरक्षक (प्रादेशिक) निनू सोमराज यांनी दि. ३० मे २०२५ रोजी त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.


शासन, निवड समितीच्या लक्षात का आणून दिले नाही?

  • महसूल व वनविभागाच्या राज्यस्तरीय पदक निवड समितीची बैठक प्रधान सचिव (वने) यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडली होती. या बैठकीत सन २०२०-२०२१, २०२१-२०२२ आणि २०२२-२०२३ या वर्षात प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून वर्षनिहाय पदकांसाठी ७९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांची शिफारस केली होती.
  • यात आरएफओ स्नेहल अवसरमल यांची वन, वन्यजीव संरक्षणात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन २०२२-२०२३ या वर्षासाठी सुवर्णपदकासाठी निवड करण्यात आली होती.

 

फेब्रुवारीत चौकशी समिती गठित, मार्चमध्ये सुवर्णपदक

  • नवापूरच्या वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांच्या संदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने २४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली होती.
  • आरएफओ अवसरमल यांनी नवापूर प्रादेशिकमध्ये २६ लाख ६१ हजार २३० रुपये, तर रोहयोत १८ लाख ४६ हजार ९२ रुपये असे एकूण मिळून ४५ लाख १७ हजार ३२२ रुपयांची अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.


प्रस्ताव तपासला कुणी? वनविभागात मुख्य वनसंरक्षकांकडून
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावांची पुरस्कारासाठी शिफारस मागविली जाते. या शिफारशीनुसार गोपनीय अहवाल, सचोटी, चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, बुद्धिमत्ता व त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आदींचा विचार करून पदके प्रदान करण्यासाठी निवड समिती ठरविते. असे असताना स्नेहल अवसरमल यांचा प्रस्ताव तपासला कुणी? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Web Title: Forest Department's gold medal-winning RFO suspended after 40 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.