सिंभोरा परिसरात परदेशी पक्षी
By Admin | Updated: January 9, 2016 00:25 IST2016-01-09T00:25:21+5:302016-01-09T00:25:21+5:30
जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण हे जिल्ह्यातील लाखो माणसांची व शेतीची तहान भाविण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून करीत आहे.

सिंभोरा परिसरात परदेशी पक्षी
स्थलांतरित पक्ष्यांचा भरणा : भागवली जातेय अन्नाची भूक, पर्यटकांचे आकर्षण
अमरावती : जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण हे जिल्ह्यातील लाखो माणसांची व शेतीची तहान भाविण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून करीत आहे. परंतु अलीकडे परदेशी आणि स्थलांतरित पक्ष्यांची अन्नाची महत्त्वपूर्ण गरजही हे जलाशय पूर्ण करताना दिसत आहे. शेकडो परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे या धरणावर अन्नाची भूक भागवत असून येथेच्छ मुक्तविहार करताना आढळत आहेत.
अमरावतीचे वन्यजीव लेखक प्र.सु. हिरुरकर आणि पक्षी अभ्यासक कुमार पाटील हे रविवार दिनांक ३ जानेवारी सिंभोरा धरण परिसरात पक्षी निरीक्षणाकरिता गेले असता केगो पक्ष्याच्या पल्लास केगो, तपकिरी केगो, काळशीर केगो तर कुररीमध्ये कल्ला कुररी, नदी सुरय, राजहंस या समुद्री पक्ष्यांचे असंख्य थवे येथे आढळून आले आहेत. यात काळशीर केगो , तपकिरी केगो, पल्लासची केगो, नदी कुररी, कल्ला कुररी, तर आर्ली इ. शेकडो पक्ष्यांचे थवे या धरणावर आढळून आले आहेत.
सायबेरियन स्टोनचॅट हा दुर्मिळ पक्षी व ब्लॅक टेल्ड गॉडविट हा पक्षीही या जलाशयावर आढळून आला आहे. राजहंस या परदेशी स्थलांतरीत पक्ष्याचे अनेक थवे येथे आढळून आले आहेत. भारतात ‘समुद्री केगो’ हे पक्षी हिवाळयात स्थलांतर करुन येतात. तिबेट, लडाख, मानस सरोवर आणि हिमालयाच्या पर्वतरांगा थव्याने ओलांडून ते समुद्रकिनारी पोहोचतात. येथे ते आपली अन्नाची भूक भागवतात. हिवाळा संपला की मार्चमध्ये त्यांचा मूळ अधिवास असलेल्या रशिया, मंगोलिया, युरोपमधील अतीथंडीच्या प्रदेशाकडे परततात. तेथे त्यांची वीण होते. विशेषत: हे सर्व पक्षी अप्पर वर्धा जलाशयावर सुदृढ अवस्थेत दिसून आले असून स्वच्छंद विहार करताना आढळून आले आहेत. त्यामुळे विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पक्षी अभ्यासकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)