पाच वर्षांत १० हजारांवर रोपट्यांचे झाले वृक्षात रुपांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST2020-10-06T05:00:00+5:302020-10-06T05:00:02+5:30
अनेकांना वेगवेगळे छंद असले तरी, जगावर आलेले ग्लोबल वॉर्मिंगसारखे संकट पाहता ते दूर करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून कुठलीही अपेक्षा न ठेवता ते ध्येयवेडे एकत्र आले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्यात दरवर्षी वृक्षलागवड मोहीम राबविली जाते. त्यापैकी किती वृक्ष जगले याचा हिशेब मोजक्या शासकीय कार्यालय व संस्था ठेवतात.

पाच वर्षांत १० हजारांवर रोपट्यांचे झाले वृक्षात रुपांतर
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्याकरिता तालुक्यातील काही ध्येयवेड्यांनी एकत्र येऊन पाच वर्षांपूर्वी रोपट्यांची लागवड केली होती. त्यांची निगा राखल्याने सद्यस्थितीत त्या १० हजार रोपट्यांचे वृक्षात रुपांतर झाले आहेत.
अनेकांना वेगवेगळे छंद असले तरी, जगावर आलेले ग्लोबल वॉर्मिंगसारखे संकट पाहता ते दूर करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून कुठलीही अपेक्षा न ठेवता ते ध्येयवेडे एकत्र आले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्यात दरवर्षी वृक्षलागवड मोहीम राबविली जाते. त्यापैकी किती वृक्ष जगले याचा हिशेब मोजक्या शासकीय कार्यालय व संस्था ठेवतात. परतवाडा शहरात काही वर्षांपासून आदिवासी पर्यावरण संघटनेच्यावतीने त्याचा लेखाजोखा ठेवण्यात आला. पाच वर्षांत १० हजारांवर लावलेल्या रोपट्यांचे वृक्ष आणि आता झाडात रुपांतर होऊ लागले आहे. शहर सौंदर्यावर शासन-प्रशासन भर देत असला तरी वृक्षलागवड मोहिमेत फोटो काढून प्रसिद्ध करण्यापर्यंतच अनेकांची धावपळ असते. या सर्व बाबीला फाटा देत आदिवासी पर्यावरण संघटना एकला चलोप्रमाणे पुढे निघाली आणि त्यांच्या हाकेला ओ देत येथील प्रशासकीय अधिकारी सामाजिक संघटनांनी पुढे येऊन चांगल्या कामाची सुरुवात जुळ्या शहरात मागील पाच वर्षांपूर्वी केली, हे विशेष.
शाळा, मंदिर-मशिद, चर्च परिसरात वृक्षारोपण
आदिवासी पर्यावरण संघटनेने वृक्षलागवड मोहिमेत मंदिर-मशिद, मदरसा खुल्या जागेत सामाजिक वनीकरण, नगर परिषद व वनविभागाच्या सहकाऱ्याने लाखो झाडे लावलीत. यात संघटनेचे योगेश खानजोडे, संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, प्रदीप चांदूरकर, प्यारेलाल प्रजापती, नवीन प्रजापती, राजेन्द्र मुंदे, ममता डहाके, मनीराम चिलाटी, राज इंगळे बाबाराव बेठे, किशन जामकर, सहकारी नागरिक जितु तुरकडे, संतोष मोहोकर आदींचा समावेश आहे.
वृक्ष कटाईवरही लावले निर्बंध
वृक्षलागवड मोहिमांवर जनजागृती करीत शालेय विद्यार्थी ते प्रशासकीय अधिकारी, नागरिकांनी हिरीरीने सहभाग घेऊन वृक्षलागवड केली. परंतु मनमर्जीने वृक्षकटाई मोहीम सुरू केल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. वृक्षकटाई करण्यापूर्वी पालिकेच्यावतीने स्थापन केलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी सबंधितांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना वृक्षकटाईला आळा बसणार आहे.