‘ति’च्या मालकत्वासाठी ‘त्याला’ संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST2022-06-06T05:00:00+5:302022-06-06T05:00:46+5:30
रविवारी राजेशने ‘त्या’ महिलेला मोबाइल कॉल केले. मात्र, तिने कॉल रिसिव्ह न केल्याने ती सचिनसोबत असावी, अशी शंका त्याला आली. त्यामुळे राजेशने सचिन खरात याला फोन कॉल करून त्याला चांगापूर फाट्याजवळ बोलावले. ‘ती’देखील तेथे पोहोचली. सचिन व राजेशमध्ये ‘ति’च्यावरून वादावादी झाली. यात राजेशने सचिन खरातच्या छातीवर, पोटावर चाकूने सपासप वार केले. त्या झटापटीत राजेशच्या मांडीवरदेखील चाकूचा वार झाला.

‘ति’च्या मालकत्वासाठी ‘त्याला’ संपविले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पतीपासून विभक्त महिलेचे मालकत्व माझ्याकडेच, असे दरडावून सांगत तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला थेट ढगात पोहचविण्यात आले. चांगापूर फाट्याजवळ रविवारी दुपारी २ ते २.१५ च्या सुमारास हा रक्तरंजित थरार घडला. यात चाकूने वार करण्यात आल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर झटापटीत मारेकरीदेखील जखमी झाला. ‘एक फूल, दो माली’ पठडीतील या खूनप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आरोपी मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सचिन विजय खरात (२७, रा. नवसारी) असे मृताचे नाव आहे. राजेश पंडितराव गणोरकर (३३, सोनोरी, ता. चांदूरबाजार) या मारेकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो पोलिसांच्या निगराणीत आहे. पोलीस सूत्रानुसार, पतीपासून विभक्त ३२ वर्षीय विवाहित महिलेची आठ-नऊ महिन्यांपूर्वी सचिन खरातशी ओळख झाली. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले, तर अलीकडे तिची व राजेशचीदेखील ओळख होऊन स्नेहबंध निर्माण झाला. दरम्यान, तिचे सचिनशी प्रेमसंबंध असल्याची जाणीव राजेशला झाली. रविवारी राजेशने ‘त्या’ महिलेला मोबाइल कॉल केले. मात्र, तिने कॉल रिसिव्ह न केल्याने ती सचिनसोबत असावी, अशी शंका त्याला आली. त्यामुळे राजेशने सचिन खरात याला फोन कॉल करून त्याला चांगापूर फाट्याजवळ बोलावले. ‘ती’देखील तेथे पोहोचली. सचिन व राजेशमध्ये ‘ति’च्यावरून वादावादी झाली. यात राजेशने सचिन खरातच्या छातीवर, पोटावर चाकूने सपासप वार केले. त्या झटापटीत राजेशच्या मांडीवरदेखील चाकूचा वार झाला. सचिन हा रक्तबंबाळ स्थितीत पडल्याचे पाहून त्या महिलेनेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. तेथे सचिन खरातला तपासून मृत घोषित करण्यात आले, तर राजेश गणोरकरवर उपचार सुरू आहेत. डीसीपी एम.एम. मकानदार, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
त्याचा उचलत असेल, माझा नाही!
आपला फोन कॉल उचलत नाही. मात्र, सचिनचा कॉल रिसिव्ह करीत असेल, त्यामुळे त्यांच्यात अजूनही प्रेमसंबंध कायम असतील, असा संशय राजेशला होता. त्यातून उद्भवलेल्या वादात राजेशने सचिनचा काटा काढला. याप्रकरणी मृताचा भाऊ जय ऊर्फ जितेश खरात याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी राजेश गणोरकरविरुद्ध कलम ३०२ व ॲट्राॅसिटीअन्वये गुन्हा दाखल केला.