अखेर अमरावती ‘एटीसीं’च्या संगीत-खुर्चीचा खेळ थांबला
By गणेश वासनिक | Updated: June 3, 2023 16:11 IST2023-06-03T16:09:05+5:302023-06-03T16:11:39+5:30
सुरेश वानखेडे यांच्या यवतमाळ येथील बदलीचे आदेश रद्द, ‘मॅट’च्या निर्णयापूर्वीच शासन आदेश निर्गमित

अखेर अमरावती ‘एटीसीं’च्या संगीत-खुर्चीचा खेळ थांबला
अमरावती : आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांची दीड वर्षातच प्रशासकीय कारणास्तव यवतमाळ येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्तपदी झालेली बदली शासनाने २ जून रोजी आदेशाद्वारे रद्द केली आहे. त्यामुळे गत दोन महिन्यांपासून सुरू असलेला ‘एटीसीं’च्या संगीत- खुर्चीचा खेळ थांबला आहे.
एटीसी सुरेश वानखेडे यांची यवतमाळ येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्तपदी १९ एप्रिल २०२३ रोजी बदली करण्यात आली होती. मात्र, वानखेडे यांनी या बदलीसंदर्भात ‘मॅट’कडे धाव घेत बदलीस स्थगिती आणली होती; परंतु, मॅटचा निकाल येण्यापूर्वीच २ जून रोजी वानखेडे यांचे बदली आदेश रद्द करण्यात आले आहे.