Finally, the railway parcel facility started in Badnera | अखेर बडनेऱ्यात रेल्वे पार्सल सुविधा सुरू
अखेर बडनेऱ्यात रेल्वे पार्सल सुविधा सुरू

ठळक मुद्देरेल्वेच्या अधिसूचना : प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांचे आर्थिक उत्पन्न तपासणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आर्थिक उत्पन्नात माघारल्याच्या कारणास्तव बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद केलेले पार्सल कार्यालय शनिवारपासून पुन्हा सुरू झाले आहे. पार्सलमधून मिळणारे उत्पन्न तीन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर तपासले जातील. त्यानंतर रेल्वे प्रशासन हे पार्सल सुविधा सुरू ठेवावी अथवा नाही? यावर निर्णय घेणार आहे. त्याअनुषंगाने मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांनी ८ नोव्हेंबर रोजी अधिसूचना काढली.
बडनेरा रेल्वे स्थानक अस्तित्वात आले तेव्हापासून येथे पार्सल कार्यालय होते. मात्र, उत्पन्न घटल्यामुळे बडनेºयातील रेल्वे पार्सल बंद करण्यात आले. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, लघु व्यावसायिकांना मालाची ने-आण करण कठीण झाले. मध्यंतरी व्यावसायिकांनी खासदार नवनीत राणा यांची भेट घेत बडनेऱ्यातील पार्सल कार्यालय सुरू करण्याबाबत साकडे घातले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी मुंबईत रेल्वेच्या महाप्रबधकांना पत्र पाठवून पुन्हा पार्सल कार्यालय सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नुकतेच मुंबई मुख्यालयाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक आलोक मिश्रा यांनी बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकावरील पार्सल उत्पन्नाचा आढावा घेतला. मिश्रा यांनी काही व्यापारी, उद्योजक, नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान व्यावसायिकांनी बडनेरा परिसरातून शेतीमाल मुंबई, पुणेकडे पाठविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर आलोक मिश्रा यांनी या भेटीचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. त्यानुसार मुंबई मध्य रेल्वे विभागाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक (मालभाडे सेवा) व्ही.पी. दाहाट यांनी बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद करण्यात आलेले पार्सल कार्यालय सुरू करण्याबाबत अधिसूचना काढली आहे.

बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद झालेले पार्सल कार्यालय सुरु केल्यास शेतकरी, व्यापाऱ्यांना माल बाहेरगावी पाठविणे सुकर होईल. त्याअनुषंगानेच मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांना पत्र पाठविले. आता याचा लाभ घेत रेल्वेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.
- नवनीत रवि राणा
खासदार, अमरावती

Web Title: Finally, the railway parcel facility started in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.