वडील घरफोडीत, मुलगा दुचाकीचोरीत माहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:29+5:30
शेख आसिफ याचे वडील शेख छोटू शेख दिलावर याच्याविरुद्ध घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. शेख छोटूला काही दिवसांपूर्वी राजापेठ पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक केली होती. त्याने शहरातील चार घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सध्या तो मध्यवर्ती कारागृहात आहे. यादरम्यान शेख छोटूचा मुलगा शेख आसिफ अमरावतीत दाखल झाला.

वडील घरफोडीत, मुलगा दुचाकीचोरीत माहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘बाप से बेटा सवाई’ ही म्हण घरफोडी आणि दुचाकीचोरीत मग्न आरोपी पिता-पुत्राला तंतोतंत लागू होते. शेख छोटू शेख दिलावर ऊर्फ ईल्ली नामक आरोपी घरफोडीत, तर त्याचा मुलगा शेख आसिफ शेख छोटू ऊर्फ ईल्ली हा दुचाकीचोरीत माहीर असल्याचे निदर्शनास आले. राजापेठ पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शेख छोटूकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला, तर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी शेख आसिफकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
रोशन मधुकर दुसरे (३१, रा. पोटे टाऊनशिप) यांची एमएच २७ एजी ८४४३ या क्रमांकाची दुचाकी बसस्थानक रोडवरील विश्रामगृह परिसरातून ८ जानेवारी रोजी लंपास करण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तपासादरम्यान शेख आसिफ शेख छोटू ऊर्फ ईल्ली व आणखी एका दुचाकीचोराला सापळा रचून रंगेहात पकडले. त्याच्याकडून १ लाख २८ हजारांच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
शेख आसिफ याचे वडील शेख छोटू शेख दिलावर याच्याविरुद्ध घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. शेख छोटूला काही दिवसांपूर्वी राजापेठ पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक केली होती. त्याने शहरातील चार घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सध्या तो मध्यवर्ती कारागृहात आहे. यादरम्यान शेख छोटूचा मुलगा शेख आसिफ अमरावतीत दाखल झाला. त्याने शहरातून चार दुचाकी चोरल्या. कोतवाली हद्दीतील दोन गुन्हे आणि राजापेठ हद्दीतील एका गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्याकडून आणखी दुचाकीचोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. घरफोडी आणि दुचाकी चोरीतील आरोपी पितापुत्रांचे हे कारनामे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. घरफोडीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर कारागृहात जाणे आणि बाहेर येताच पुन्हा घरफोड्या आणि दुचाकी चोरण्यात हे पिता-पुत्र माहीर असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उमक, पोलीस हवालदार नीलेश जुनघरे, जुनेद खान, आशिष विघे, इम्रान खान यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी परिश्रम घेतले.