गुरूदेव भक्तांचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण
By Admin | Updated: October 26, 2016 00:24 IST2016-10-26T00:24:00+5:302016-10-26T00:24:00+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेवर टीका करणाऱ्या पंढरपूर येथील निवृत्ती वक्ते याला तातडीने अटक करावी...

गुरूदेव भक्तांचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण
आंदोलन : निवृत्ती वक्ते यांना अटक करण्याची मागणी
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेवर टीका करणाऱ्या पंढरपूर येथील निवृत्ती वक्ते याला तातडीने अटक करावी या मागणीसाठी २२ आॅक्टोबरपासून जिल्हाकचेरीसमोर राष्ट्रसंत मिशन, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
पंढरपूर येथील निवृत्ती वक्ते यांनी एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर टीकात्मक भाष्य केले आहे. गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आमचा वैष्णव सांप्रदायाचा विरोध करीत होते. म्हणून त्यांचे अभंग कीर्तन आम्ही घेत नाही, असा आरोप वक्ते यांच्या पुस्तकात करण्यात आले आहे. हे सर्व खोटे आरोप लाखो भक्तांच्या भावना दुखावणारे आहेत. त्यामुळे सदर पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्यात याव्यात आणि निवृत्ती वक्ते यांना अटक करावी, अशी मागणी उापेषणकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात राष्ट्रीय मिशनचे अध्यक्ष किसन पारिसे, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे नरेंद्र कठाणे, नामदेव हेकडे, गोंडूजी पाटील महाराज, रामेश्र्वर मेहत्रे, किशोर महल्ले, विवेकानंद बेरडे, आकाश बावनकर, राहुल इंगोले, निखिल साव, मनोहर साबळे, जनार्दन नांदणे, महेश पारिसे आदींचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)