भरधाव ट्रकने शंभरावर मेंढ्यांना चिरडले, परतवाडा-अंजनगाव मार्गावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 17:19 IST2021-11-09T16:54:27+5:302021-11-09T17:19:30+5:30
मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास सावळी दातुरा गावाच्यापुढे वळणावर हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेला ट्रक रस्त्याच्या कडेवरुन जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपात घुसला आणि शंभरावर मेंढ्या चिरडल्या गेल्या.

भरधाव ट्रकने शंभरावर मेंढ्यांना चिरडले, परतवाडा-अंजनगाव मार्गावरील घटना
अमरावती : परतवाडा अंजनगाव मार्गावर भरधाव ट्रकने शेकडो मेंढ्यांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यात १०२ मेंढ्या ठार झाल्या, तर ४० मेंढ्या गंभीर जखमी आहेत.
मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास सावळी दातुरा गावाच्यापुढे वळणावर हा भीषण अपघात घडला. राजस्थानवरून आणलेल्या मेंढ्या आकोटकडे नेण्यात येत होत्या, तर ट्रक (आरजे ११ जेबी ४४५२) अंजनगावहून परतवाडाकडे येत होता. यावेळी भरधाव वेगात असलेला ट्रक रस्त्याच्या कडेवरुन जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपात घुसला. या अपघातात शंभरावर मेंढ्या चिरडल्या गेल्या. या भीषण घटनेनंतर रस्त्यावर रक्ताचा नुसता सडा पडला होता.
घटना घडताच चालक घटनास्थळावरून पसार झाला, तर मदतनीस ट्रकमध्येच आढळून आला. घटनेनंतर चालक पथ्रोट पोलीस ठाण्याच्या स्वाधीन झाला, तर मदतनिसाला परतवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.