तळणी येथे शेतकरी महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 20:17 IST2017-12-12T20:17:26+5:302017-12-12T20:17:38+5:30
मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कुटुंबातील वृद्धेने आर्थिक विवंचनेत राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

तळणी येथे शेतकरी महिलेची आत्महत्या
मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कुटुंबातील वृद्धेने आर्थिक विवंचनेत राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी व मुलाचे मागील काही वर्षांपासूनचे आजारपण यामुळे ८२ वर्षीय वृद्ध महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. अन्नपूर्णा माणिकराव तिडके असे मृत महिलेचे नाव असून ती मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत चिंताग्रस्त असायची.
वृद्ध महिलेला राजेंद्र तिडके नामक मुलगा असून त्यांनी चार मुलींचे लग्नकार्य केल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा होता. त्यातच मागील ३ ते ४ वर्षांपासून सततची नापिकी व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे कर्जही होते. यावर्षी सोयाबीन व भेंडीच्या उत्पादनात तोटा झाला असून पीक हाती न घेता नांगरणी केली होती. त्यातच काही वर्षांपासून राजेंद्र तिडके यांना रक्ताची कमतरतेचा आजार जडल्यामुळे औषधोपचाराचा खर्चही वाढला होता. त्यामुळे घराची जबाबदारी अन्नपूर्णा तिडके यांच्यावर आली होती.
१२ डिसेंबर रोजी घरात कुणी नसताना सदर महिलेने ओढणीने दुपारी ३ चे सुमारास गळफास घेतला. यावेळी सून शेतात कामासाठी तर मुलगा, नातवंडे, नातेवाईकांकडे होते. सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. अन्नपूर्णाबाई घराजवळील श्रीकृष्ण मंदिरात रोज सकाळ-संध्याकाळ पूजाअर्चा करायची. घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच ठाणेदार आर. के. राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून, याप्रकरणी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असाआप्त परिवार आहे. मुलगा व एक नातू यांचे नावे १० एकर शेती आहे. मुलाचे नावे सामूहिक १० एकर शेती सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे ३.५० लाख कर्ज, सावकारी ५० हजार उसनवार व इतर ३ लाख, मुलाचे सततचे आजारपण, एक नातीचे विवाह कार्य, मागे मुलगा राजेंद्र (६०), २ विवाहित मुली सून व नातवंडे.