शेतकऱ्यांनी वन्यप्राणी व चोरट्यांपासून बचाव करण्यासाठी शेतजमिनीवरच लावले सीसीटीव्ही कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:50 IST2025-03-11T13:49:16+5:302025-03-11T13:50:01+5:30

Amravati : शेतकऱ्यांनी वन्यप्राणी व चोरट्यांपासून बचाव करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराचा उपयोग होईल

Farmers install CCTV cameras on farmland to protect against wild animals and thieves | शेतकऱ्यांनी वन्यप्राणी व चोरट्यांपासून बचाव करण्यासाठी शेतजमिनीवरच लावले सीसीटीव्ही कॅमेरे

Farmers install CCTV cameras on farmland to protect against wild animals and thieves

अमोल कोहळे 
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी:
परिसरातील शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या शेतात लावून घेतले आहेत. त्यामुळे शेतात दररोज नाहक फेरफटका मारण्याऐवजी घरबसल्या संपूर्ण शेतावर नजर रोखण्याची किमया त्यांनी साधली आहे. शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटांची मालिका सुरू असताना वन्यप्राणी आता शेतकऱ्याची झोप उडवीत आहे. यासाठी ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी वन्यप्राणी व चोरट्यांपासून बचाव करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराचा उपयोग करून शेतात पाळत ठेवणे सुरू केले आहे. हरीण, रोही, चितळ, सांबर रानडुक्कर, माकड यासारखे तृणभक्षी वन्यप्राण्यांचे कळप जंगला लगतच्या शेती परिसरात शिरकाव करीत असल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी जिवाचे रान करावे लागते. मात्र आता ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी पिकाचे संरक्षण व्हावे व मानवी श्रमही वाचवता यावे या उद्देशाने शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतले आहेत.


शेतातही सीसीटीव्ही
शासकीय व खासगी जागांवर मुख्यत्वाने सीसीटीव्ही कॅमेरे दिसून येतात. मात्र आता याचा फायदा होत असल्याचे निदर्शनात आल्याने शेतकऱ्यांनीदेखील शेतात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची शक्कल लढविली आहे. यामुळे मानवाकडून शेतातील शेती अवजारांच्या चोरीवर व वन्यप्राण्यांकडून पिकांच्या होणाऱ्या नासाडीवर काही प्रमाणात अंकुश लागला आहे हे विशेष. यामुळे चोऱ्यांवर नियंत्रण मिळाले आहे.


रात्रीला जागल थांबणार
पोहरा बंदी येथील एका शेतकऱ्याने चार एकर शेती परिसरात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसून घेतले आहेत. हे चारही कॅमेरे संपूर्ण शेत परिसरावर निगराणी ठेवते. शेती परिसरात कुठल्याही भागात कोणी शिरकाव केल्यास या सीसीटीव्ही कॅमेराच्या साहाय्याने घरबसल्या दिसून येताच शेतमालक शेताकडे धाव घेतो. अशाप्रकारे कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाइल कनेक्टिव्हिटीच्या साहाय्याने घरबसल्या शेती परिसरातील हालचाली टिपल्या जातात. या प्रयोगाने काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होऊ लागल्याचे चित्र शिवारात दिसून येत आहे.

Web Title: Farmers install CCTV cameras on farmland to protect against wild animals and thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.