कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हताश !
By Admin | Updated: May 18, 2016 00:18 IST2016-05-18T00:18:07+5:302016-05-18T00:18:07+5:30
शेततळयात पाण्याचा ठणठणाट, विहिरींची खोल गेलेली पातळी, तालुक्यातून वाहणाऱ्या सापन, बिच्छन आणि पिली या कोरडया पडलेल्या नद्या,

कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हताश !
शेतकरी खचला : सोशल मीडियावर चर्चा
अचलपूर : शेततळयात पाण्याचा ठणठणाट, विहिरींची खोल गेलेली पातळी, तालुक्यातून वाहणाऱ्या सापन, बिच्छन आणि पिली या कोरडया पडलेल्या नद्या, भारनियमनाचा अडसर, पिकांवर आलेला अज्ञात रोग या सर्वांशी दोन हात करीत हाती आलेल्या कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादकांच्या डोळयात पाणी आले आहे.
अचलपूर तालुक्यात ५४ हजार १११ हेक्टर जमीन शेतीयोग्य असून १ हजार १७६ हेक्टरमध्ये यावर्षी मोठया आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. कांद्याचे उत्पादन चांगले व्हावे, नापिकीची तूट थोडयाफार प्रमाणात भरुन निघावी म्हणून अस्मानी आणि सुल्तानी संकटावर मात करुन शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. पीक घरात आले. कांदा साठविण्याची सर्वत्र लगबग सुरु आहे. मात्र, कांद्याचे दर कोसळलेले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांद्याला प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपये भाव सद्यस्थितीत दिला जात आहे.
मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने सर्वच पिकांना तोटा सहन करावा लागल्याने आर्थिक व मानसिक खीळ बसलेल्या शेतकऱ्यांना थोडा आधार देण्यासाठी शेतकऱ्यांची मुले सरसावल्याचे सोशल मीडियावरून फिरणाऱ्या संदेशावरुन दिसत आहे. कांदा खाणारे ग्राहक व राजकीय नेत्यांच्या शेतकऱ्यांबद्दलच्या अनास्थेबाबतची, भावनिक आणि विनोदी मजकुराची चर्चा सोशल मिडियावर रंगत आहे. शेतकऱ्यांची भावना व मेहनतीची कदर करणारे संदेश पाठविण्याची चढाओढ सध्या दिसून येत आहे. कधी सरकारच्या तर कधी ग्राहकांच्या डोळयात पाणी आणणाऱ्या कांद्याने दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या बळी राजाच्या डोळ्यात पाणी आणले.
खरीप हंगाम खराब हवामानामुळे वाया गेला तर रबीत बदलत्या हवामानाबरोबरच बाजारात कांद्याला मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे उत्पादन खर्चही निघत नसून शेतकरी आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडला आहे.