विद्या प्राधिकरणातील सहायक शिक्षकांना मुदतवाढ, २६५ शिक्षकांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 16:51 IST2018-10-31T16:51:00+5:302018-10-31T16:51:13+5:30
महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रादेशिक विद्या प्राधिकरणात कार्यरत २६५ विषय सहायक शिक्षकांना ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाचा समावेश आहे.

विद्या प्राधिकरणातील सहायक शिक्षकांना मुदतवाढ, २६५ शिक्षकांचा समावेश
अमरावती - महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रादेशिक विद्या प्राधिकरणात कार्यरत २६५ विषय सहायक शिक्षकांना ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाचा समावेश आहे.
प्रादेशिक विद्या प्राधिकरणात कार्यरत विषय सहायक शिक्षकांची पुणे येथे १९ जून २०१८ रोजी मूल्यांकन कार्यशाळा घेण्यात आली. तसेच या मूल्यांकनानंतर पुनर्मूल्यांकनाची आवश्यकता असलेल्या तसेच काही अपरिहार्य कारणास्तव मूल्यांकनास अनुपस्थित असलेल्या प्रतिनियुक्त विषय सहायकांसाठी पुनर्मूल्यांकन कार्यशाळा १५ आॅक्टोबर २०१८ रोजी पार पडली. या कार्यशाळेच्या अहवालाअंती सहायक शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीत मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. विषय सहायक शिक्षक हे जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. मुदतवाढ झालेल्या ठिकाणी शिक्षकांना सेवा द्यावी लागणार आहे. प्रतिनियक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्या पदावर सेवेचा कोणताही अधिकार असणार नाही. प्रतिनियुक्ती भत्ता अनुज्ञेय नाही. वेतन व भत्ते हे आस्थापनेवरून काढण्यात येतील. प्रतिनियुक्ती कालावधीत विषय सहायक शिक्षकांचे कामकाज समाधान कारक नसल्यास तसेच संस्थेच्या हितास बाधा पोहचेल असे काही गैरवर्तणूक निदर्शनास आल्यास प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून मूळ आस्थापनेवर रूजू व्हावे लागेल. विषय सहायक शिक्षकास सेवा, नियम, अटी, शर्ती लागू राहतील, असे विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी ३० आॅक्टोबर रोजीच्या आदेशात स्पष्ट केले आहे.
अशी मिळाली सहायक शिक्षकांना मुदतवाढ
ठाणे -७, रायगड- १०, पालघर- ५, अहमदनगर- ७, पुणे -६, सोलापूर- ८, नाशिक-६, नंदूरबार- ८, धुळे- ८, जळगाव-२, सातारा- ४, रत्नागिरी- ६, सिंधुदूर्ग- ५, कोल्हापूर- ८, सांगली- ६, आरंगाबाद- १०, जालना- १०, परभणी- ११, हिंगोली- १०, बीड- ९, लातूर- १२, नांदेड-१०, उस्मानाबाद- ९, वाशिम- ५, बुलडाणा- १२, यवतमाळ-८, अमरावती- ९, अकोला-८, वर्धा- ८, नागपूर-४, चंद्रपूर- ८, गोंदिया- १०, भंडारा- ७, गडचिरोली- ९ शिक्षकांना मुदतवाढ मिळाली आहे.