प्रयत्नांची शर्थ करूनही काळ जिंकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:16 IST2018-09-26T22:15:34+5:302018-09-26T22:16:01+5:30
आईने आपले एक अंग - किडनी देऊन आपले मातृत्व सिद्ध केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दोन महिने मुलगा डोळ्यांपुढे होता. त्याची प्रकृती सुधारत असल्याचे दिसत होते. मात्र, काळाने मायेच्या ममतेवर मात केली. कमिश्नर कॉलनीतील या घटनेतून आईच्या ममतेचे ज्वलंत उदाहरण पुढे आले आहे.

प्रयत्नांची शर्थ करूनही काळ जिंकला
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आईने आपले एक अंग - किडनी देऊन आपले मातृत्व सिद्ध केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दोन महिने मुलगा डोळ्यांपुढे होता. त्याची प्रकृती सुधारत असल्याचे दिसत होते. मात्र, काळाने मायेच्या ममतेवर मात केली. कमिश्नर कॉलनीतील या घटनेतून आईच्या ममतेचे ज्वलंत उदाहरण पुढे आले आहे.
कमिश्नर कॉलनीतील रहिवासी सुनील कुंटे यांच्या छोट्याशा कुटुंबात पत्नी रोहिणी, मुलगा अनिकेत व मुलगी ऋतुजा अशा चौघांचा सुखाचा जीवनप्रवास सुरू होता. अनिकेत तंत्रनिकेतनचे शिक्षण घेत होता. त्याची काही दिवसांत परीक्षा होती. मात्र, १ मार्च रोजी अनिकेतची प्रकृती बिघडली. त्याच्या अंगावर सूज आल्याने उपचारासाठी नागपूर येथील डॉ. समीर चौबे यांच्याकडे नेण्यात आले. तपासणीअंती अनिकेतच्या एका किडनीचा आकार लहान तर, दुसरी निकामी झाल्याचे पुढे आले. तथापि, लहानपणीपासूनच किडनीची ही स्थिती होती. ती आता कुंटे कुटुंबापुढे उघड झाली होती.
अवघ्या २२ वर्षीय अनिकेतला किडनीचा आजार जडल्याचे समजताच कुंटे कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी उपचार सुरू केला. डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लॉन्टचा सल्ला दिला. पैसाअडका गेला तरी चालेल, पण मुलाचा जीव वाचावा, अशी मानसिकता कुंटे कुटुंबीयांची होती. मी बरा झालो की, पुढे पैसे कमावण्यासाठी हवे तितके परिश्रम घेईल, असे आश्वासन अनिकेत आई-वडिलांना वारंवार देत होता. अनिकेतची सकारात्मक विचारसरणी व आत्मविश्वास पाहून आई-वडिलांना तो या सर्वातून सहीसलामत बाहेर येईल, असा विश्वास वाटत होता. त्यानंतर अनिकेतला किडनी देण्याचा प्रश्न समोर आला. तुमची किडनी मुलाला मॅच होऊ शकते, असे डॉक्टरांनी अनिकेतची आई रोहिणी यांना सांगितले. रोहिणी काही क्षणाकरिता विचारमग्न झाल्या.
एकीकडे मुलाचे आयुष्य, तर दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी, अशा दुविधेत त्या होत्या. मात्र, मुलाच्या आयुष्यात आपले भविष्य असल्याने त्या हिमतीने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाल्या. रोहिणी यांनी किडनी देण्याचा निर्णय घेतला. २४ जुलै रोजी नागपूर येथील वोक्हार्ट हॉस्पिटल येथे किडनी ट्रान्सप्लान्ट करण्यात आली. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे पाहून कुंटे कुटुंबीय आनंदित झाले. रुग्णालयातून सुट्टी घेऊन सगळे जण कमिश्नर कॉलनीतील घरी परतले. दीड महिन्यानंतर १० सप्टेंबर रोजी अनिकेतला फंगल इन्फेक्शन व डायरियाचा त्रास जाणवला. त्याला पुन्हा वोक्हार्ट हॉस्पिटलला दाखल केले. रिकव्हर झाल्यानंतर अनिकेत पुन्हा घरी आला. पूर्वीप्रमाणेच त्याची दिनचर्या पुन्हा सुरू झाली. मात्र, रविवारी २३ सप्टेंबरच्या रात्री अनिकेतला अचानक घाबरल्यासारखे झाले. उठण्या-बसण्यास त्रास जाणवला. ‘पप्पा मला अस्वस्थ वाटत आहे’, असे त्याने वडिलांना सांगितले. आई-वडिलांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून अनिकेतला घेऊन नागपूरकडे रवाना झाले. रुग्णवाहिकेत असताना आईच्या हातात हात देऊन अनिकेत तिच्याच चेहऱ्याकडे पाहत होता. ‘मी सुधारेन, चांगला होईन’, अशी हिंमत आईला देत होता. पण, पाहता पाहता अनिकेतचे शरीर थंड पडले आणि त्याची प्राणज्योत मालवली. आईने हंबरडा फोडला. ज्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी प्राणांची बाजी लावली, त्याच्या मृतदेहाशेजारी ओक्साबोक्सी रडायला लागली. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अखेर काळ जिंकला.
वडिलांना अर्धांगवायू
अनिकेतचे वडील सुनील कुंटे कमिश्नर आॅफिसमध्ये कार्यरत आहेत. साधारण परिस्थितीत त्यांनी कुटुंबीयांचे पालनपोषण केले. त्यांना योग्य शिक्षणप्रवाहात आणले. आता समाधानाचे दिवस येणारच होते; तेवढ्यात सुनील यांना अर्धांग्वायूचा झटका आला. ते सद्यस्थितीत आजारीच असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातच अनिकेत हा मोठा आधारवड गेल्यामुळे कुंटे कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.