दोन कोटींवर मिळाले आठ लाखांचे कमिशन, श्रीसूर्या प्रकरणात राऊतला नागपुरातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 17:57 IST2017-11-15T17:56:52+5:302017-11-15T17:57:10+5:30
अमरावती : श्रीसूर्या कंपनीच्या फसवणूक प्रकरणात अमरावती पोलिसांनी प्रकाश रामदेव राऊत (७९, रा. दीपनगर, अमरावती) याला सोमवारी रात्री नागपुरातून अटक केली.

दोन कोटींवर मिळाले आठ लाखांचे कमिशन, श्रीसूर्या प्रकरणात राऊतला नागपुरातून अटक
अमरावती : श्रीसूर्या कंपनीच्या फसवणूक प्रकरणात अमरावती पोलिसांनी प्रकाश रामदेव राऊत (७९, रा. दीपनगर, अमरावती) याला सोमवारी रात्री नागपुरातून अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी प्रकाश राऊतला अमरावतीत आणले. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. राऊतने अमरावती शहरातून २ कोटी रुपये गोळा करून ८ लाखांचे कमिशन प्राप्त केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.
गुंतवणूकदारांना पैसे दुप्पट करून देण्याचे प्रलोभन देऊन श्रीसूर्या कंपनीने नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाल्यावर ३० आॅक्टोबर २०१३ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात सर्वप्रथम एक तक्रार दाखल झाली. त्यानंतर श्रीसूर्याविरोधात तब्बल ६५० तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या. त्यामध्ये ६५ कोटींनी फसवणूक झाल्याचे नमूद आहे. पोलिसांनी श्रीसूर्या कंपनीच्या १५ पदाधिका-याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. श्रीसूर्या कंपनीसाठी काम करणारा प्रकाश राऊत याचा ब-याच दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. त्याला नागपूर पोलिसांनी अटक केली. राऊत याने अमरावतीमधील अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले आहे. त्याच्याविरुद्ध २६ तक्रारी पोलिसांकडे आहेत. नागरिकांकडून त्याने २ कोटींची रक्कम गोळा केली असून त्यावर त्याने आठ लाखांचे कमिशन घेतल्याचे पोलीस चौकशीत समोर आले.
दीपनगरात कार्यालय उघडून राऊत याने नागरिकांचे पैसे गोळा केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. राऊत याला पोलिसांनी प्रोड्युस वॉरंटवर ताब्यात घेतले असून, त्याची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. राऊत हे वयोवृद्ध असून त्यांना बीपी व मधुमेहासारखे आजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.