फवारणी औषधाच्या संसर्गामुळे शेतक-यावर उपासमारी, खर्च झाला पण पीक गेलं वाया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 14:40 IST2017-10-12T14:39:10+5:302017-10-12T14:40:16+5:30
शेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे.

फवारणी औषधाच्या संसर्गामुळे शेतक-यावर उपासमारी, खर्च झाला पण पीक गेलं वाया
नांदगाव खंडेश्वर - शेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे. पायात होत असलेल्या प्रचंड वेदाना, शेतीसाठी झालेला खर्च, आणि हाताशी आलेलं पीक वाया गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
नांदगाव खंडेश्वर येथील मोहम्मद शरीफ यांनी ५ सप्टेंबर १७ ला नांदगावातील कृषी केंद्रातून यूपीएल कंपनीचे दोस्त सुपर नावाचे तणनाशक फवारणी औषध विकत घेतले व ७ सप्टेंबरला शेतात फवारणी करीत असताना डाव्या पायावर औषध सांडले. फवारणी करीत असतानाच दोन तासानंतर त्यांच्या पायाला वेदना होणे सुरू झाले. या शेतक-याने घरी आल्यानंतर स्वच्छ पाण्याने पाय धुतले. परंतु तरीही वेदना कमी होत नव्हत्या. अखेर गावामधील खासगी दवाखान्यात त्यांनी उपचार घेतले. आठ दिवस उपचार घेऊनही वेदना कमी होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी अमरावती येथील डॉ.पाटणकर, डॉ. संजय अग्रवाल, डॉ.राजेंद्र राठी यांचेकडे उपचार घेतले. परंतु अद्यापही त्यांचा पायाचा त्रास कमी झाला नाही. आता या शेतक-याला पायाने चालणेही कठीण झाले आहे.
शेतात जाणे अशक्य झाल्याने शेतीसाठी लागलेला ४०,००० रुपये खर्चही वाया गेला व हातातोंडाशी आलेले पीकही वाया गेल्याने या शेतकऱ्यासमोर आर्थिक विवंचना निर्माण झाली आहे. फवारणी औषधाच्या संसर्गामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत संबंधित कृषी केंद्रधारकाने यूपीएल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता ते या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आले. परंतु आमच्या औषधामुळे कुठलाच संसर्ग होत नाही, अशी बतावणी करून यूपीएल कंपनीचे कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन निघून गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. जर तणनाशक फवारणी औषध कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असेल तर शेतक-यांच्या व्यथा जाणणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
यूपीएल कंपनीच्या दोस्त सुपर नावाच्या तणनाशक औषधामुळे शेतक-यांच्या पायाला संसर्ग झाला आहे. अनेक दवाखान्यात उपचार घेऊनही त्यांना आराम नाही. त्यामुळे उपचारावर झालेल्या नुकसानीची भरपाई यूपीएल कंपनीने द्यावी, अन्यथा कंपनीविरोधात तीव्र आंदोलन उभारू.
- फिरोज खान, नगरसेवक, नांदगाव खंडेश्वर