ड्रायव्हिंग स्कूलसाठी आता स्वतंत्र ‘ट्रॅक’
By Admin | Updated: February 16, 2015 00:22 IST2015-02-16T00:22:13+5:302015-02-16T00:22:13+5:30
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर रस्ते वाहतुकीच्या नियमावलीत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.

ड्रायव्हिंग स्कूलसाठी आता स्वतंत्र ‘ट्रॅक’
लोकमत विशेष
गणेश वासनिक अमरावती
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर रस्ते वाहतुकीच्या नियमावलीत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने रस्त्यांवरील होणारे अपघात टाळण्यासाठी नवीन वाहतूक नियमावलीचा मसुदा तयार केला जात आहे. राजपत्रानुसार आता वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देताना ड्रायव्हिंग स्कुलला स्वतंत्र ‘ट्रॅक’ निर्माण करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूलला रस्त्यावर प्रशिक्षण देता येणार नाही, हे विशेष.
केंद्र शासनाच्या राजपत्रात नमूद असलेल्या बाबींचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी केंद्रीय भूतल मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक नियमांमध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. परंपरागत पद्धतीने सुरु असलेले वाहन चालविण्याचे परवाने आणि प्रशिक्षणात बराच बदल करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये पहिल्या टप्प्यात वाहन चालविण्याचा परवाना आॅनलाईन करण्यात आला आहे. तसेच वाहन चालविण्याचे परवाने मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे आरटीओत सुरु असलेल्या दलालांच्या हैदोसावर अंकुश लावणे सुकर झाले आहे. दरवर्षी रस्ते अपघातात निरपराधांचे मृत्यू होण्याची संख्या ही लाजिरवाणी बाब असल्याची खंत काही महिन्यांपूर्वी ना. गडकरी यांनी जाहिररीत्या व्यक्त केली होती. वाहतूक नियमावलीत असलेल्या पळवाटा, विना परवाना वाहन चालविण्याचा प्रकार, चालकांना वाहतूक नियमांचे अज्ञान अशा एक ना अनेक प्रश्नांवर गडकरींनी बोट ठेवले होते.
वाहन चालविण्याचे प्रशिक्षण महागणार
आरटीओंनी प्रमाणित केलेल्या ड्रायव्हिंग स्कूलमधून हल्ली वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. या स्कूलच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीनुसार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. चारचाकी वाहनांचा प्रशिक्षणासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याची माहिती आहे. मात्र नवीन नियमावलीनुसार ‘ट्रॅक ’मध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरु झाले की, १० ते १५ हजार रुपये शुल्क आकारले जाईल, असे संकेत आहेत.
आॅनलाईन परवाने नोंदणीची केवळ प्रतीक्षाच
प्रादेशिक परिवहन विभागात पारदर्शकता आणण्यासाठी वाहन चालविण्याचे परवाने मिळण्यासाठी आॅनलाईन नोंदणी, परीक्षा सुरु केली आहे. मात्र शिकाऊ (लर्निंग) परवान्यासाठी १५० तर कायमस्वरुपी (परमनंट) परवान्यासाठी ११० उमेदवारांचे आॅनलाईन नोंदणी करता येते. त्यामुळे लर्निंगसाठी दीड ते दोन महिने तसेच परमनंट परवान्यासाठी अडीच ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागते, अशी ओरड ड्रायव्हिंग स्कूल संचालकांची आहे.