‘त्या’ चिमुकलीसाठी डॉक्टर दाम्पत्य ठरले देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:48 IST2018-08-27T21:47:51+5:302018-08-27T21:48:12+5:30
घरासमोर झालेल्या अपघातात चार महिन्यांची एकुलती चिमुकली दगावली. आभाळाएवढे दु:ख मनात असताना, सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत अमरावतीच्या डॉ. सावरकर दाम्पत्याने तिच्या स्मृतिदिनी एका चिमुकलीवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करून समाजाला नवी दिशा दिलीे़

‘त्या’ चिमुकलीसाठी डॉक्टर दाम्पत्य ठरले देवदूत
मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : घरासमोर झालेल्या अपघातात चार महिन्यांची एकुलती चिमुकली दगावली. आभाळाएवढे दु:ख मनात असताना, सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत अमरावतीच्या डॉ. सावरकर दाम्पत्याने तिच्या स्मृतिदिनी एका चिमुकलीवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करून समाजाला नवी दिशा दिलीे़
अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटलचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर यांची नात म्हणजेच डॉ़ उमेश व अश्विनी सावरकर या दाम्पत्याची मुलगी मीरा ही घरासमोरील अपघातात आठ महिन्यांपूर्वी दगावली होती. परिवार दु:खात असतानाही त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत चार महिन्यांच्या मीराचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शासनाकडून परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने हा निर्णय बारगळला. तथापि, आठ महिन्यानंतर मीराच्या स्मृतिदिनी त्यांनी हृदयाला छिद्र असलेल्या वाघोलीच्या चार वर्षीय पायल पराते या चिमुकलीवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शासनाकडून कुठलीही मदत तिला मिळणार नव्हती व पराते कुुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिच्यावर संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये आठ दिवसांपूर्वी रूजू झालेले डॉ. सुपीत अन्नाधांडे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.
पायलला मिळाला जगण्याचा आधार
अचलपूर तालुक्यातील कुंभ वाघोली येथील पायल केशव पराते ही साडेचार वर्षाची चिमुकली. वजन व उंची वाढत नसल्याने आई-वडील चिंताग्रस्त होते. त्यात वारंवार न्यूमोनिया उद्भवत होता. तिच्या आई- वडिलांनी विविध चाचण्या केल्या असता, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. या चाचण्यांमध्ये तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे स्पष्ट झाले़ संत अच्युत महाराज हॉस्पिटलमध्ये उमेश सावरकर यांच्या आर्थिक मदतीने मीराच्या स्मृतीप्रीत्यर्थ मोफत शस्त्रक्रिया करून तिला नवे जीवन देण्यात आले. पायलचे वडील मजुरी करतात. सावरकर कुटुंबाने सामाजिक जाणिवेतून केलेली मदत आदर्शवत आहे.