कोरोना लसीचे १६,७०० डोस जिल्ह्यास प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST2021-01-15T04:11:43+5:302021-01-15T04:11:43+5:30
अमरावती : कोरोनाविरुद्धचा लढा आता निर्णायक स्थितीवर पोहोचला आहे. कोविशिल्ड लसीचे १६,७०० डोस जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. ...

कोरोना लसीचे १६,७०० डोस जिल्ह्यास प्राप्त
अमरावती : कोरोनाविरुद्धचा लढा आता निर्णायक स्थितीवर पोहोचला आहे. कोविशिल्ड लसीचे १६,७०० डोस जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. बुधवारी रात्री २ वाजता इन्सुलेटेड कोल्डव्हॅनद्वारे हे सर्व व्हायल जिल्हा परिषदेतील व्हॅक्सिन स्टोअरमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. १६ जानेवारीला पाच केंद्रांत लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे.
लस घेऊन येणारे वाहन अकोल्याहून बुधवारी रात्री २ वाजता जिल्ह्यात पोहोचले. प्राप्त लसी शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही गुरुवारी सकाळी लसवाहिका व शीतसाखळी केंद्राची पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्या अनेक अधिकारी उपस्थित होते.
लसीकरण केंद्राच्या संख्येत नव्याने बदल करण्यात आला आहे. आता पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच केंद्रांवर शुभारंभदिनी लसीकरण होईल. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी ५०० लाभार्थ्यांना लस दिली जाईल. पहिल्या टप्प्यात १८ वर्षे वयाचे वरील १६ हजार २६२ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे.
बॉक्स
आरोग्य यंत्रणेद्वारा रांगोळीद्वारे स्वागत (बॉक्समध्ये रांगोळीचा फोटो घ्यावा)
कोरोना प्रतिबंधक लस मकरसंक्रांतीच्या पर्वावर लस येऊन पोहोचली याचा आनंद व्यक्त करत आरोग्य विभागातील महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांनी हॅपी टू व्हॅक्सिनची रांगोळी रेखाटून स्वागत केले. वर्षभर ही सर्व मंडळी कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत आहेत.
बॉक्स
०.५ मिलीचा राहणार एक डोज
एका व्हायलमध्ये ५ मिली लस राहणार आहे. लसीकरणात ०.५ मिलीचा एक डोज राहणार असल्याने एका व्हायलमध्ये पाच डोज होतील व हे लसीकरण इन्ट्रामॉस्क्यूलर देणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. पहिल्या डोजनंतर २८ दिवसांनी दुसरा डोज देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
बॉक्स
दिनांक अन् वेळेचा एसएमएस
कोविन ॲपवर हेल्थ केअर वर्करची ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यानूसार ॲपद्वारे १०० कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात येऊन त्यांना लसीकरणाचे केंद्र व वेळेचा एसएमएस जनरेट होणार आहे. लसीकरणाचे वेळी संबंधित कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व अधारकार्ड आणावे लागणार आहे.
बॉक्स
२ ते ८ अंश तापमानात साठवणूक
जिल्ह्यास प्राप्त झालेल्या किविशील्ड लसीची व्हॅक्सीन स्टोअर रुममध्ये २ ते ८ अंश तापमानात साठवणूक करण्यात येत आहे. ज्या केंद्रात लसीकरण करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा शीतकरणाची सुविधा आहे. या पाचही केंद्रांवर लाभार्थी कर्मचाऱ्यांना सॅनिटाईझ करुन प्रवेश देण्यात येणार आहे.