सोशल डिस्टन्स ठेवून धान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:01 IST2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:01:00+5:30
‘कोरोना’ रोखण्यासाठी शाळेत होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सर्वच शाळांना ३१ मार्च पर्यत सुटया जाहीर करण्यात आल्या. आता तर १४ एप्रिलपर्यत ‘लॉकडाऊन’ घोषित झाले आहे. या सत्रातील शाळा भरण्याची शक्यताच नाही. दरम्यान कालावधीत शालेय पोषण आहारासाठी प्रत्येक शाळेत एक ते दोन महिन्याचा तांदुळाचा साठा शिल्लक आहे.

सोशल डिस्टन्स ठेवून धान्याचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळी, कडधान्याचे विद्यार्थ्याना ‘सोशल डिस्टन्स’ ठेवून वितरण सुरू करण्यात येत आहे.
‘कोरोना’ रोखण्यासाठी शाळेत होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सर्वच शाळांना ३१ मार्च पर्यत सुटया जाहीर करण्यात आल्या. आता तर १४ एप्रिलपर्यत ‘लॉकडाऊन’ घोषित झाले आहे. या सत्रातील शाळा भरण्याची शक्यताच नाही. दरम्यान कालावधीत शालेय पोषण आहारासाठी प्रत्येक शाळेत एक ते दोन महिन्याचा तांदुळाचा साठा शिल्लक आहे. तर दूसरीकडे संचारबंदी, ’लॉकडाऊन’ मुळे बहुतांश पालकांचा रोजगारही थांबला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ही स्थिती लक्षात घेता शालेय पोषण आहाराच्या धान्याची विद्यार्थ्याना समप्रमाणात वाटप करण्याचे राज्य स्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सीईओ अमोल येडगे यांनी शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात १४ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पालकांना बोलावून धान्य वाटप करताना संचारबंदीत ‘सोशल डिस्टन्सिंग’चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ठराविक अंतरावर वर्तुळ रेखाटून त्या वर्तुळातच पालक, विद्यार्थ्याना उभे राहून धान्य वाटप करण्यात येत आहे.