‘धम्माल गल्ली’त ओसंडला उत्साह!
By Admin | Updated: April 27, 2015 00:02 IST2015-04-27T00:02:27+5:302015-04-27T00:02:27+5:30
स्थळ बदलले..पण लोकांचा उत्साह मात्र तोच होता.. ...

‘धम्माल गल्ली’त ओसंडला उत्साह!
जोष, उत्साह, ऊर्जेचा अनुभव : मार्शल आर्ट, तलवारबाजी, स्केटिंग, गीत गायन
अमरावती : स्थळ बदलले..पण लोकांचा उत्साह मात्र तोच होता.. ‘लोकमत’ची काही कारणास्तव मागील रविवारी रद्द झालेली 'धम्माल गल्ली' २६ एप्रिलच्या रविवारी होणार हे कळताच अमरावतीकरांनी पुन्हा एकदा दाखविलेला उत्साह अवर्णनीय होता. अमरावतीकर आबालवृध्द पुन्हा जोषाने, उत्साहाने आणि नव्या ऊर्जेने या उपक्रमात समरसून सहभागी झाले. विविध ग्रुप, शाळकरी विद्यार्थी आणि आबालवृध्दांनी कार्यक्रमात शब्दश: धम्माल केली.
सकाळी साडेसहा वाजतापासूनच अमरावतीकर नागरिकांचे लोंढे जिल्हा स्टेडियमकडे वळत होते. चिमुकली ‘धम्माल’ अनुभवण्यास उत्सुक होती. हळूहळू उपक्रमाला रंगत येत गेली. यंदाच्या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची मार्शल आर्टस् आणि सेल्फ डिफेन्सवर आधारित प्रात्यक्षिके. मार्शल आर्टसच्या प्रशिक्षकांसह प्रशिक्षणार्थ्यांनी तलवारबाजी, लाठीकाठी आणि मार्शल आर्टच्या आधारे स्वरक्षणाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली, बडनेरा येथील राजेश्वर युनियन हायस्कूलच्या मुलांनी रोप स्किपिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.
पुढची ‘धम्माल गल्ली’
इर्विन चौकात
‘लोकमत’च्या ‘धम्माल गल्ली’ला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता पुढच्या रविवारी हा उपक्रम पुन्हा इर्विन चौक ते गर्ल्स हायस्कूल मार्गावर होणार आहे. पुन्हा एकदा अमरावतीकर रसिकांना या ‘धम्माल गल्ली’त धम्माल करण्याची संधी मिळणार आहे.
कविता वाचन, बासरी वादन
एका ज्येष्ठ हौशी बासरीवादकाने स्वत:च्या हाताने तयार केलेल्या पाईपच्या बासरीवर सुरेल धून छेडली आणि आबालवृध्दांची पावले त्यांच्याकडे वळली. त्यांनी एकापाठोपाठ एक सुरेल गीते बासरीच्या माध्यमातून ऐकविली. कोठेही शास्त्रशुध्द प्रशिक्षण न घेता केवळ सरावावर त्यांनी हे कसब मिळविले आहे. याच वेळी कविता वाचनाची हौसही काहींनी भागवून घेतली. महागाई, राजकारण आणि इतर सामाजिक घडामोडींवर आधारित कवितांना उपस्थित श्रोत्यांनी समरसून दाद दिली.