अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:14 IST2023-01-11T15:08:15+5:302023-01-11T15:14:41+5:30
पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ.रणजित पाटील यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत

अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात
अमरावती : अडीच वर्ष मविआ सरकार बंदिस्त होतं. बंद दाराआड आणि फेसबुकवरुन कारभार चालायचा. अनेक मंत्री, अधिकारी जेलमध्ये जाताना दिसत होते. वर्क फ्रॉम होम आपण बघितलं होतं, पण वर्क फ्रॉम जेलसुद्धा आपण आधीच्या सरकारमध्ये बघितलं, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती येथे आले आहेत. यावेळी सभेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. जेव्हा-जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार येतं तेव्हा तेव्हा फक्तं तोंडाला पानं पुसण्याशिवाय दुसरं काही केलं जात नाही. मागील सरकारच्या अडीच वर्षात पानंदेखील हलली नाहीत. अनेक मंत्र्यांचं वर्क फ्रॉम जेल सुरू होतं, असे अनेक आरोप फडणवीस यांनी केले. तर, एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी उठाव केला म्हणत सत्तांतर घडून आणल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
मागच्या सरकारने वसुलीचे उच्चांक गाठले. मंत्री जेलमध्ये तरीही राजीनामा घेतला नाही, आम्ही मुख्यमंत्री बदलला. अनेक योजना सरकारने आणल्या, सहा महिन्यात सरकार काय असतं याची जाणीव लोकांना झाली. उद्योगांच्या पाठीशी उभं राहण्याचा आमचा निर्धार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच, ब्लॅकमेल करणाऱ्यांना सरकार धडा शिकवेल असेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून डॉ. रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. डॉ. रणजित पाटील यांनी सर्व खाती अतिशय चांगली सांभाळली. आमदार निधी व्यवस्थित वापरला. मला विश्वास आहे की आपण सर्व प्रयत्न करुन पुन्हा त्यांना विजयी कराल, अशी भावनीक साद फडणवीसांनी घातली.