लाचखोर एएसआयसह पोलीस जमादार अटकेत
By Admin | Updated: September 22, 2015 00:17 IST2015-09-22T00:17:31+5:302015-09-22T00:17:31+5:30
कुऱ्हा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन नागोराव भटकर (५६, रा. कुऱ्हा) याच्यासह वाहतूक ...

लाचखोर एएसआयसह पोलीस जमादार अटकेत
एसीबीची कारवाई : पोलीस विभागात खळबळ
तिवसा : कुऱ्हा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन नागोराव भटकर (५६, रा. कुऱ्हा) याच्यासह वाहतूक शाखेतील जमादार राहुल सांळुखे (५२, रा. कुऱ्हा) याला ३ हजारांची लाच घेताना सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली.
कुऱ्हा पोलीस ठाण्यांतर्गत परिसरात शंकर बुरे व उत्तम मेश्राम यांचा वाद झाला होता. त्यासंदर्भात एनसी तक्रारीवरून भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल न करता केसचा निपटारा करण्याकरिता भटकर व सांळुखेने ३ हजारांची लाच मागितली होती. बुरेच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून एएसआय मोहन भटकर व जमादार राहूल सोंळकेला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक एम. डी. चिमटे, अप्पर पोलीस अधीक्षक एस. एल. मुंढे व पोलीस उपअधीक्षक आर. बी. मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, पुजा खांडेकर, राजवत आठवले, पोलीस शिपाई गजेंद्र, धिरज, अक्षय, विक्रम, जाकीर, भडांगे यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)