‘दीपक सुपेकर अमर रहे'; 'भारत माता की जय'च्या घोषात जवानावर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 21:32 IST2024-01-13T21:31:36+5:302024-01-13T21:32:44+5:30
विलासनगर परिसरातील शिवनगर येथील दीपक सुपेकर हे २०११ पासून बीएसएफमध्ये चंडीगढ मुख्यालयी कार्यरत होते.

‘दीपक सुपेकर अमर रहे'; 'भारत माता की जय'च्या घोषात जवानावर अंत्यसंस्कार
मनीष तसरे
अमरावती : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये १२ वर्षे सेवा देणाऱ्या शहरातील रहिवासी असलेल्या जवानाचा मेंदूसंबंधी विकाराने चंडीगढमध्ये मृत्यू झाला. शनिवारी त्यांचे पार्थिव अमरावती येथे आणल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
दीपक सदाशिव सुपेकर (३३), असे मृत बीएसएफ जवानाचे नाव आहे.
विलासनगर परिसरातील शिवनगर येथील दीपक सुपेकर हे २०११ पासून बीएसएफमध्ये चंडीगढ मुख्यालयी कार्यरत होते. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दाेन मुली आहेत. चंडीगढ येथून त्यांचे पार्थिव विमानाने नागपूर व तेथून अमरावतीला आणण्यात आले. शनिवारी त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघाली तेव्हा आसमंतात ‘दीपक सुपेकर अमर रहे’, ‘भारत माता की जय’चा घोष निनादत होता. यावेळी शेकडो नागरिक, गाडगेनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी, तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. विलासनगर येथील स्मशानभूमीत त्यांना भडाग्नी देण्यात आला. यावेळी नागपूर व चंडीगढ येथून आलेल्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली.