पंचबोल पॉइंटवरून कोसळून दोघांचा मृत्यू, माकडाच्या मागे धावताना कोसळले दरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 20:02 IST2017-12-04T20:02:03+5:302017-12-04T20:02:16+5:30
चिखलदरा (अमरावती) : येथील पंचबोल पॉइंटवरील पाचशे फूट खोल दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.

पंचबोल पॉइंटवरून कोसळून दोघांचा मृत्यू, माकडाच्या मागे धावताना कोसळले दरीत
चिखलदरा (अमरावती) : येथील पंचबोल पॉइंटवरील पाचशे फूट खोल दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. माकडाने जॅकेट हिसकून पळ काढला. त्याच्या मागे धावताना दरीत कोसळल्याने हा अपघात घडला. या घटनेनंतर पंचबोल पॉइंटवर गर्दी उसळली होती.
नयन श्रीकृष्ण ढोक (१९) व वैभव साहेबराव पावडे (२३) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, ते चांदूरबाजार तालुक्यातील खराळा येथील रहिवासी होते. वैभव पावडे, नयन ढोले, स्वप्नील डाखोडे, सुमीत फुटाणे, अक्षय तुपटकर व त्यांचा मित्र अमोल हे दोन दुचाकीने चिखलदरा येथे आले होते. पंचबोल पॉइंटवर निरीक्षण करीत असताना माकडांनी नयनचे जॅकेट पळविले. तो माकडाच्या मागे धावला. तोल गेल्याने दरीत कोसळला. नयनला वाचविण्यासाठी गेलेला वैभवही पाठोपाठ पाचशे फूट खोल दरीत कोसळला.
घटनेची माहिती मिळताच मरिमपूर येथील आदिवासींच्या बचाव पथकाने दोघांना बाहेर काढले. नयनचा मृत्यू झाला होता, तर वैभव गंभीर जखमी असल्याने त्याला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून, ठाणेदार धर्मा सोनूने चौकशी करीत आहेत. चिखलद-यात मागील तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे काही औरच !
माकडाने जॅकेट नेल्याने हा अपघात झाल्याचे मृतांच्या सोबत असलेल्यांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हे युवक एकमेकांच्या मागे धावत, मस्ती करीत असल्याने हा अपघात घडला.