खळबळजनक! मोर्शीत दिवाणच्या बाॅक्समध्ये आढळला आई-मुलाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 11:21 IST2023-09-02T11:15:37+5:302023-09-02T11:21:01+5:30
घातपाताचा संशय

खळबळजनक! मोर्शीत दिवाणच्या बाॅक्समध्ये आढळला आई-मुलाचा मृतदेह
मोर्शी (अमरावती) : शिवाजीनगर येथील घरात शुक्रवारी दुपारी आई आणि मुलाचा मृतदेह पेटी दिवाणच्या बॉक्समध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
मोर्शीतील शिवाजीनगर येथील दिवंगत गणेश कापसे यांची पत्नी नीलिमा गणेश कापसे (४५) व मुलगा आयुष गणेश कापसे (२२) हे घरात होते. सतत पाच ते सहा दिवसांपासून मोबाइलवर संपर्काचा प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नीलिमाचे वडील शुक्रवारी कोंढाळीहून मोर्शीला आले. घराचे दार उघडत नसल्याचे पाहून त्यांनी पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या माहितीवरून मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे व त्यांच्या चमूने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कापसे यांच्या घराजवळील परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली होती.
पोलिसांनी घराचे दार उघडून बघितले असता त्यांना पेटी दिवाणमध्ये नीलिमा व आयुषचे कुजलेले मृतदेह आढळून आले. यावेळी कॉलनी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. नीलिमा व आयुष यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. नीलिमा या एमआरजीएसमध्ये काम करीत होत्या तर आयुष हा शिक्षण घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.