दर्यापूर सूतगिरणी बंद होणार?
By Admin | Updated: August 9, 2016 00:07 IST2016-08-09T00:07:23+5:302016-08-09T00:07:23+5:30
येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीचा लिलाव करण्याचा एमएस बँकेचा घाट असल्याचा आरोप कामगार नेता रवि कोरडे यांनी केला आहे.

दर्यापूर सूतगिरणी बंद होणार?
कामगारांचे भविष्य धोक्यात : एमएस बँकेचा घाट, पुनरूज्जीवनाची मागणी
दर्यापूर : येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीचा लिलाव करण्याचा एमएस बँकेचा घाट असल्याचा आरोप कामगार नेता रवि कोरडे यांनी केला आहे. कामगारांच्या शेतकऱ्यांच्या हक्काची असलेली ही सूतगिरणी वाचविण्यासाठी सर्व नेत्यांनी व सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन लढा द्यावा, असे मत रवि कोरडे यांनी व्यक्त केले.
दर्यापूरची सूतगिरणी २००७ पासून बंद आहे. या सूतगिरणीवर कोट्यवधी रुपयांचे राज्य सहकारी बँक (एमएस बँक)चे कर्ज आहे. त्यामुळे बँकेने या सूतगिरणीला सील लावले आहे. गेल्या ९ वर्षांपासून ७०० कामगारांचा रोजगार यामुळे बंद पडला आहे. काहींनी दुसरा रोजगार शोधला, तर अनेकांवर उपासमारीची पाळी आली असून ज्या कामगारांनी आयुष्यभर या सूतगिरणीत काम केले. ते कामगार सूतगिरणी सुरूहोईल, या भाबड्या आशेने चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत.
सूतगिरणी बंद पडायला अनेक कारणे आहेत. बँकेकडून सूतगिरणीेच्या उभारणीसाठी जे कर्ज घेण्यात आले त्या कर्जाचे नेहमीत हप्ते न भरणे, वीज वितरण कंपनीचे थकीत बिल व वारंवार सूतगिरणी बंद पडणे, अशा अनेक कारणांमुळे सूतगिरणीला अखेरची घरघर लाभली आहे. एप्रिल २०१६ मध्ये वस्त्रोउद्योग मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गिरणी ही भाडेतत्त्वावर चालविण्याबाबत चर्चा करून या बैठकीत सूतगिरणीचे पुनर्जीवन करण्यासंदर्भात शासनाच्या विचारधीन होते. सदर सूतगिरणी अवसायनात निघाल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाने सदर सूतगिरणी अवसायकाने विकून बँकेचे कर्ज फेडावे, असे एमएस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पण शासनाने हा मुद्या गंभीरतेने घेतला नाही. गिरणीची विक्री करण्याबाबतचे आदेश बँकेच्या अधिकाऱ्यांना मिळाले असून ही गिरणी जर विकली तर याची २२ कोटी एवढी निधारित किंमत असून गिरणीकडून बँकेचे कर्ज, सभासद, भागभांडवल, शासन भागभांडवल, हमी, शुल्क, हमी शुल्कावरील दंड व्याज, दीर्घ मुदत कर्ज, वीज बिल असे २००५ च्या अहवालानुसार व इतर देणी असे १२२ क ोटींच्या घरात देणी असून ही सूतगिरणी बँकेने विकली. बँकेचे व अनेकांचे कर्ज बुडेल, त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन या सूतगिरणीला पुनर्जीवित करावे व भाडेतत्त्वावर देऊन त्याचे उत्पन्न वाढवावे व बँकेचे कर्ज व शेतकऱ्यांचे भागभांडवलचा यातून भरणा करावा व कामगारांना रोजगार मिळवून द्यावा, अशी कामगारांची व शेतकऱ्यांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)