धरणे हाऊसफुल्ल, अतिवृष्टीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST2021-09-10T05:00:00+5:302021-09-10T05:00:57+5:30
अमरावती तालुक्यातील बडनेरा मंडळात १११.५ मिमी व शिराळा मंडळात ६२.५ मिमी पाऊस कोसळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा मंडळात ११६ मिमी व धानोरा मंडळात ९८.८ मिमी पाऊस कोसळला. परिणामी माहुली चोर येथे पुलावरून पाणी गेले. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला मंडळात ९३.५ मिमी पाऊस झाला. तिवसा तालुक्यातील मोझरी शिवारात ७२.३ मिमी पावसाची नोंद झाली, धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी मंडळात ६६.५ मिमी पावसाची नोंद झाली.

धरणे हाऊसफुल्ल, अतिवृष्टीची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून विजांच्या कडकडाटाने सुरू झालेल्या पावसाच्या पाण्याने सात मंडळांमध्ये अतिवृष्टी आणली. धामणगाव, चांदूर रेल्वे, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, तिवसा या पाच तालुक्यांमध्ये पाऊस कोसळत आहे.
अमरावती तालुक्यातील बडनेरा मंडळात १११.५ मिमी व शिराळा मंडळात ६२.५ मिमी पाऊस कोसळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा मंडळात ११६ मिमी व धानोरा मंडळात ९८.८ मिमी पाऊस कोसळला. परिणामी माहुली चोर येथे पुलावरून पाणी गेले. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला मंडळात ९३.५ मिमी पाऊस झाला. तिवसा तालुक्यातील मोझरी शिवारात ७२.३ मिमी पावसाची नोंद झाली, धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी मंडळात ६६.५ मिमी पावसाची नोंद झाली. ३२५ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले.
एक जण गेला वाहून
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी लखाड-खिराळा मार्गावरील पुलावरून पाय घसरल्याने वाहून गेला.
तालुकानिहाय बाधित गावांची संख्या
तिवसा तालुक्यात २२, भातकुली २३, चांदूर रेल्वे ५, धामणगाव रेल्वे २७, नांदगाव खंडेश्वर ५, मोर्शी ४, वरूड ७, अंजनगाव सुर्जी ८, अचलपूर २, धारणी १, चिखलदरा ५ अशी एकूण १०९ गावे २४ तासांच्या मुसळधार पावसाने बाधित झाली.
१७ जणांचा रेस्क्यू
तिवसा तालुक्यातील भिवापूर तलावात अडकलेल्या सहा जणांचा गुरुवारी रेस्क्यू करण्यात आला. एकपाळा येथील त्रिवेणी संगमावर अडकलेल्या तिघांना पुरातून बाहेर काढण्यात आले. रायगड प्रकल्पाच्या पाण्यामुळे कोलाड नदीच्या पुरातून पळसखेड, दिघी येथील आठ जणांना बाहेर काढले.
२७८ घरांचे नुकसान
तिवसा तालुक्यातील ८७, भातकुली ७६, चांदूर रेल्वे १४, धामणगाव रेल्वे १७, नांदगाव खंडेश्वर ५१, मोर्शी ७, वरूड ९, अंजनगाव सुर्जी ९, अचलपूर २, धारणी १ व चिखलदरा ५ अशा २७८ घरांचे अंशत: नुकसान झाले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ३, वरूड १, अंजनगाव १ अशी पाच घरे पूर्णत: कोलमडली.
पर्यटकांची उसळली गर्दी
धरणाचे दारे केव्हा उघडतात, याची प्रतीक्षा जिल्ह्यातीलच नव्हे, तर विदर्भातील नागरिकांना असते. त्यामुळे १३ दारे उघडण्यात आल्याची वार्ता पसरताच पर्यटक आणि वाहनांची गर्दी सकाळपासून झाली. उपविभागीय अभियंता रमण लायचा, शाखा अभियंता गजानन साने व अप्पर वर्धा धरणाचे कर्मचारी दत्तू फंदे लक्ष ठेवून आहेत.
नदीकाठावरील गावांना इशारा
अप्पर वर्धा धरण प्रशासनाच्या वतीने नदीकाठी येणाऱ्या गावांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. धरणाचे पाणी नदीत ओसंडून वाहत आहे.