डिलिव्हरी होऊन बायको परतली; आता तू कशाला म्हणत तिला हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 14:48 IST2022-07-22T14:47:22+5:302022-07-22T14:48:52+5:30

महिलेचे लैंगिक शोषण; शिवीगाळ, बेदम मारहाण, एलआयसीची रक्कमही वापरली

crime filed against man for beating and sexual abuse of a woman | डिलिव्हरी होऊन बायको परतली; आता तू कशाला म्हणत तिला हाकलले

डिलिव्हरी होऊन बायको परतली; आता तू कशाला म्हणत तिला हाकलले

अमरावती : तू खूप आवडतेस, तुझ्यावर खूप प्रेम करतो, अशा भूलथापा देऊन एका विवाहितेचे लैंगिक शोषण करण्यात आले. पुढे तो तिला टाळू लागला. त्याबाबत जाब विचारला असता, डिलिव्हरी होऊन बायको परतली; आता तुला कशाला ठेवू, असे उत्तर मिळाले. त्यामुळे त्या महिलेने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी २० जुलै रोजी दुपारी रवी तुळशीराम भाकरे (रा. अमरावती) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडिता ही सन २०१९ पासून अग्रवाल यांचे घरी कामाला होती. त्या दरम्यान, तिथेच काम करणारा आरोपी रवीसोबत तिची ओळख झाली. आरोपीने तिला मला तू खूप आवडतेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे म्हणून प्रपोज केले. महिलेलासुद्धा आरोपी आवडत असल्याने तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. मोबाइल संवाद सुरू झाला. दरम्यान, जुलै २०१९ मध्ये आरोपीने तिला त्याच्या बहिणीच्या घरी राजुरा येथे नेले, तेथे तिला आमिष देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले.

दरम्यान, दहा महिन्याआधी पीडिताचे पती मरण पावले. तेव्हापासून ती माहेरी राहत होती. अशातच १ ऑक्टोेबर २०२१ रोजी आरोपी तिच्या माहेरी पोहोचला. भांडण व शिवीगाळ करून तिला सोबत घेऊन गेला. शिवीगाळ करत त्याने तिला रस्त्याने बेदम मारहाणदेखील केली. तेव्हापासून आरोपीने पीडिताला व तिच्या मुलीला सोबत ठेवले. पीडिताच्या मुलीच्या नावे असलेली एलआयसी पॉलिसी तोडून तिचे ६० हजार रुपये खर्च केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मेश्राम यांनी पीडितेकडून संपूर्ण लेखी जबाब नोंदवून घेतला. आरोपीच्या शोधार्थ पथके पाठविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना दिली.

घरी येणेच केले बंद

पीडित व तिच्या मुलीला स्वत:जवळ ठेवणाऱ्या आरोपी रवी भाकरे याने अचानक १ जुलैपासून घरी जाणेच बंद केले. त्यामुळे पीडिताने त्याला फोन केला असता मी तुझ्यासोबत राहत नाही. आता माझी बायको डिलिव्हरी होऊन घरी आली आहे. ती असल्यावर तुझ्यासोबत कशाला राहू, तू तुझे पाहून घे, मी तुझे पैसे देत नाही, तुला जे करायचे ते कर, अशी धमकी देऊन शिवीगाळ केल्याचे पीडिताचे म्हणणे आहे. आरोपीने आठ महिन्यांपासून आपले शारीरिक शोषण केल्याची तक्रार तिने फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली. सहायक पोलीस निरिक्षक सोनाली मेश्राम पुढील तपास करीत आहेत.

Web Title: crime filed against man for beating and sexual abuse of a woman