टॉर्चरमुळे तिने केले ब्रेकअप, तो म्हणाला का तोडलेस?
By प्रदीप भाकरे | Updated: May 29, 2023 16:59 IST2023-05-29T16:57:39+5:302023-05-29T16:59:59+5:30
वारंवार पाठलाग : शिविगाळ करून मारण्याची धमकी

टॉर्चरमुळे तिने केले ब्रेकअप, तो म्हणाला का तोडलेस?
अमरावती : इंजिनिअरिंग कॉलेजमधील क्लासमेट असलेल्या प्रेयसीने ब्रेकअप केल्याच्या कारणावरून तिच्या माथेफिरू प्रियकराने तिचा गळा कापला होता. तर त्याने देखील आत्महत्येचा बनाव केला होता. त्या घटनेची शाई वाळते न वाळतेच पुन्हा एकदा एका तरूणाने प्रेयसीचा बेमालूमपणे पाठलाग चालविल्याचा प्रकार बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. प्रेमसंबंध तोडल्याच्या कारणावरून पुर्वाश्रमीच्या प्रियकराने आपल्याला धमकावल्याची तक्रार पिडिताने बडनेरा पोलिसांत नोंदविली आहे.
शुभम उत्तमराव सहारे (२७, रा. शिवाजीनगर, बडनेरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द २८ मे रोजी दुपारी विनयभंग, शिविगाळ, जीवे मारण्याची धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, यातील फिर्यादी तरूणीची सन २०१८ मध्ये आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर ती आरोपीसोबत फोनवर बोलायची, भेटायची, व्हॉट्सअँपवर चॅटींग करायची. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध बहरले. काही दिवस सुखनैव चालले. दोघेही सोशल मिडियावर व्यक्त होऊ लागले. मात्र काही दिवसांनी आरोपी शुभम हा फिर्यादी तरूणीवर संशय घेऊ लागला. बाहेर फिरायला जाऊ नकोस, कोणासोबत बाहेर जाऊ नकोस, बाहेर गेलीस तर कुणासोबत गेली होतीस, कुणाशी बोलली तर का बोललीस, असा हुकूम तो तिच्यावर गाजवायला लागला. शिवीगाळ करून धमक्या देखील दिल्याने तरूणीने सहा महिन्यापुर्वी आरोपीसोबत असलेले प्रेमसंबंध संपुष्टात आणले. तुझा माझा संबंध संपला, असे निर्वाणीचे सांगून तिने ब्रेकअप केले.
फोनकॉलवरून धमकी, ती हादरली
आरोपी शुभम हा प्रेमसंबंध तोडल्याच्या कारणामुळे फिर्यादी तरूणीचा पाठलाग करू लागला. तिला कोठेही थांबवून प्रेमसंबंध का तोडले, या कारणावरून शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या देऊ लागला. दरम्यान, २६ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास शुभमने तरूणीला फोन कॉल केला. तथा ब्रेकअपच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ केली. त्या प्रकाराने ती नखशिखांत हादरली. त्यामुळे ती शुन्यात हरविली. मात्र आताच जर आरोपीचा बंदोबस्त केला नाही, तर त्याचा त्रास अधिक वाढेल, या विचाराने २८ ला दुपारी तिने पालकांसमवेत बडनेरा पोलीस ठाणे गाठले.