CoronaVirus News : बापरे! नवरोबा कोरोना पॉझिटिव्ह, तरीही लग्नाची घाई; रात्रीच कोविड सेंटरला रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 21:35 IST2021-05-27T21:33:08+5:302021-05-27T21:35:37+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : ॲंटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने त्याला विवाह करण्यास मनाई केली.

CoronaVirus News : बापरे! नवरोबा कोरोना पॉझिटिव्ह, तरीही लग्नाची घाई; रात्रीच कोविड सेंटरला रवानगी
वनोजा बाग (अमरावती) - अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी येथील एक तरुण नवरोबा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतरही बोहल्यावर चढण्यासाठी उतावीळ झाला. या नवरोबाच्या अट्टाहासाला बळी न पडता त्याची रवानगी लग्मंडपाऐवजी कोविड सेंटरला करण्यात आली. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे. रहिमापूर पोलीस ठाण्यांतर्गत मुऱ्हा देवी येथील एका युवकाचे गुरूवारी लग्न होते. सदर युवकाची २२ मे रोजी ॲंटिजेन टेस्ट करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. २५ मे रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात आपण निगेटिव्ह आल्याचे गृहित धरून सदर युवकाच्या मनात लगीनघाई सुरू झाली. यामुळे तो कुणाची ऐकायला तयार नव्हता.
संबंधित युवकाचा विवाह २७ मे रोजी मुऱ्हा देवी गावामध्येच होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. परंतु ॲंटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने त्याला विवाह करण्यास मनाई केली. दक्षता समितीनेसुद्धा त्याला समजावले. तालुका आरोग्य अधिकारी सुधीर डोंगरे यांनी तहसीलदार जगताप व ठाणेदार इंगळे यांच्याशी चर्चा केली. सदर युवक कुठल्याही परिस्थितीत लग्न करण्याच्या तयारीत असल्याने आणि कुणाचेही ऐकायला तयार नसल्याने अखेर रहिमापूर पोलीस प्रशासन व तसेच आरोग्य विभाग, तहसीलदार जगताप यांनी २६ मे रोजी रात्री १२ वाजता पोलीस कर्मचारी गजानन वर्मा यांना सोबत घेऊन सदर नवरोबाची पांढरी कोविड सेंटरला रवानगी केली.