CoronaVirus in Amravati: चार दिवस, ४६१ किमी प्रवास; १४ आदिवासी मजुरांची उपाशीपोटी पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 00:09 IST2020-03-28T00:08:34+5:302020-03-28T00:09:02+5:30
हैदराबादमध्ये पोटाची खळगी भरायला गेलेल्या आदिवासी मजुरांचे हाल

CoronaVirus in Amravati: चार दिवस, ४६१ किमी प्रवास; १४ आदिवासी मजुरांची उपाशीपोटी पायपीट
अमरावती: कोरोनाच्या भीतीने सर्व देश लॉकडाऊन झाला. ज्या ठेकेदाराकडे कामाला होते, त्यानेही हाकलून दिले. वाहनही उपलब्ध होऊ शकल्याने अखेर हैदराबादपासून तर धामणगाव तालुक्यातील देवगावपर्यंत तीन दिवसांचा प्रवास आदिवासी तरुणांनी उपाशी पोटी केला.
गावात रोजगार नसल्यामुळे मेळघाटातील अनेक आदिवासीचे लोंढे शहराकडे काही वर्षांत आले. हैदराबादमध्ये मेळघाटातील पाच आदिवासी तरुण मागील दोन वर्षांपासून काम करतात. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे या आदिवासी तरुणांना तिथून हाकलून देण्यात आले. त्याचबरोबर नऊ आदिवासी तरुण वर्धा जिल्ह्यात मांडवा परिसरात समृद्धीच्या कामावर काम होते. तेथूनही त्यांना काढून टाकण्यात आले. अखेर कोरोनामुळे गड्या आपला गावच बरा म्हणून हे आदिवासी तरुण पायपीट करत निघाले.
पोटात अन्न नसताना रात्र न दिवस पायपीट करत हे १४ आदिवासी मजूर धामणगाव तालुक्यातीलदेवगाव येथे पोहोचले. पेट्रोलिंग करताना तळेगाव दशासर येथील ठाणेदार रिता उईके यांना हे तरुण आढळले. त्यांनी चार दिवसांपासून उपाशी असलेल्या आदिवासी तरुणांना जेवण दिले. त्यानंतर धामणगावचे तहसीलदार भगवान कांबळे यांना कळवण्यात आले. त्यांनी तरुणांना रात्री त्यांच्या गाडीने धामणगाव येथे आणले. येथील माहेश्वरी हितकारक संघाचे अध्यक्ष मनीष मुंधडा यांनी त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.
उद्या शनिवारी सकाळी अचलपूरपर्यंत या आदिवासी मजुरांना सोडण्यात येणार आहे. तर तेथून धारणी येथील तालुका प्रशासन त्यांच्या गावापर्यंत सोडणार आहे. मागील चार दिवसांपासून उपाशी असलेल्या आदिवासी मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था धामणगाव येथील माहेश्वरी हितकारक संघ या सामाजिक संस्थेने केल्याने या सामाजिक संस्थेचे कौतुक होत आहे.